नवी दिल्ली - कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस (Congress) अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद पटकाविणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंनी (Navjot Singh Sidhu) काही दिवसांतच राजीनामा दिला आहे. अमरिंदर थोड्याच वेळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्या आधीच सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आतासारे लक्ष अमरिंदर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. याच दरम्यान सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यावर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. "मी तुम्हाला सांगितले होते… ती एक स्थिर व्यक्ती नाही आणि पंजाब राज्यासाठी योग्य नाही" असं अमरिंदर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. देशभरात भाजपाचा झंझावात सुरू असताना एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या अमरिंदर सिंग यांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकले. भाजपातील वादावरून काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांची विकेट काढली. यामुळे नाराज झालेले व दिवंगत राजीव गांधी यांचे मित्र असलेले अमरिंदर यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अमरिंदर सिंग हे आज सायंकाळी ४.३० वाजता दिल्लीला येण्याची शक्यता आहे. सुत्रांनुसार कॅप्टन दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी (Amit Shah) चर्चा करणार आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून भाजपच्या मुख्यालयात मात्र जोरदार हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे.
"रागाला स्थान नाही पण काँग्रेससारख्या जुन्या पक्षात अपमान आणि छळासाठी जागा आहे?"
अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अपमान होत असल्याचे सांगितले. पक्षाला माझ्याबाबत शंका का होती. हे मला समजत नाही आहे असं देखील म्हटलं आहे. यानंतर अमरिंदर यांनी पक्षात आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर सामान्य कार्यकर्त्याचं काय होत असेल, असा सवाल केला होता. "काँग्रेसमध्ये रागाला स्थान नाही, पण अपमान आणि छळासाठी आहे?" असं म्हणत पुन्हा एकदा अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
"सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत काय होत असेल"?
अमरिंदर यांनी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रीया श्रीनेत यांच्या विधानाचा देखील चांगलाच समाचार घेतला. पक्षात रागाला स्थान नाही, असं उत्तर त्यांनी अमरिंदर यांच्या टीकेला दिलं होतं. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांनी सुप्रीया श्रीनेत यांनी उत्तर दिलं. "हो, राजकारणात रागाला कुठलंली स्थान नाही. पण काँग्रेससारख्या इतक्या जुन्या पक्षात अपमान आणि छळ करण्यासाठी जागा आहे?" असा सवाल त्यांनी केला. "माझ्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जातेय, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत काय होत असेल?" असं देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं.