गेल्या काही महिन्यांपूर्वी पंजाब काँग्रेसमध्ये मोठे वादळ उठले होते. नवज्योत सिंग सिद्धू प्रदेशाध्यक्ष होताच त्यांनी मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंगांविरोधात आघाडी उघडून त्यांना खूर्चीवरून पायउतार होण्यास भाग पाडले होते. यानंतर अमरिंदर यांनी दिल्लीत येत भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती. आज त्या भेटीमागचे रहस्य समोर आले आहे.
अमरिंदर यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती, तेव्हा ते भाजपात जातील अशी चर्चा होती. परंतू त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करत सर्वांना धक्का दिला होता. आज अमरिंदर यांनी पंजाबची निवडणूक भाजपासोबत लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कृषी विधेयके मागे घेण्यामध्ये देखील अमरिंदर यांची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात अमरिंदर यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत दिले होते. शुक्रवारी नवी दिल्लीत कॅप्टन आणि केंद्रीय मंत्री तसेच भाजपाचे पंजाब प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांच्यात बैठक झाली. याआधी सहा वेळा त्यांच्यात चर्चा झाली होती, अखेर आजच्या बैठकीत आघाडी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे भाजप आणि कॅप्टन पंजाब विधानसभा निवडणूक 2022 एकत्र लढणार आहेत.
कॅप्टन अमरिंदर यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. भाजपासोबत विधानसभेच्या जागा वाटून घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.