ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. 16 - पंजाबचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या नकारामुळे नवज्योत सिंग सिद्धूला पंजाबचे उपमुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही. पण त्याच सिद्धूने मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या खालोखाल सिद्धूचे स्थान असू शकते कारण अमरिंदर यांच्यानंतर सिद्धूने शपथ घेतली.
क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास करणा-या सिद्धू प्रथमच मंत्रीपद भूषवत आहे. निवडणुकीच्या महिनाभर आधी सिद्धूने काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्याआधी सिद्धू आम आदमी पक्षात जाणार अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्रीपदावरुन फिस्कटल्याने सिद्धूने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागच्या आठवडयात जाहीर झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
आणखी वाचा
117 सदस्यांच्या पंजाब विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक 77 आमदार निवडून आले. सिद्धूने अमृतसर विधानसभा मतदारसंघातून 42 हजारच्या फरकाने विजय मिळवला. भाजपामध्ये असताना सिद्धू अमृतसरचे खासदार होते. 2004, 2007 आणि 2009 मध्ये ते इथून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. एप्रिल 2016 मध्ये त्यांना मोदी सरकारने खासदार म्हणून निवडून राज्यसभेवर पाठवले.