Punjab Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंगांचं ठरलं! ‘ते’ ३ मोठे ट्विट्स; भाजपला ऑफर, काँग्रेसला धक्का, सिद्धूंना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 09:51 AM2021-10-20T09:51:17+5:302021-10-20T09:52:15+5:30
Punjab Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेली तीन ट्विट्स पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारी ठरतील, असे सांगितले जात आहे.
चंदीगड: गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्याराजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबमधील राजकीय घडामोडी काँग्रेससाठी डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरू शकतात, अशी चर्चा आहे. यातच मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभराने कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amarinder singh) यांनी मोठा निर्णय घेतला असून, नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, यावेळी केलेली तीन ट्विट्स पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणारी ठरतील, असे सांगितले जात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार रवीन ठकुराल यांनी नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेसंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी करण्यात आलेली तीन ट्विट्स अतिशय महत्त्वाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पहिल्या ट्विटमध्ये नवीन पक्ष स्थापनेसंदर्भात माहिती दिली असून, दुसऱ्या ट्विटमध्ये भाजपसोबत युतीचे संकेत दिले आहेत. तर तिसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना कानपिचक्या दिल्या आहेत. अमरिंदर यांनी एकाच दगडात तीन पक्षी लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.
पंजाबच्या राजकारणात ट्विस्ट आणणारी ट्विट्स
पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंजबाच्या भविष्यासाठीची लढाई सुरु झाली आहे. पंजाब आणि येथील लोकांच्या तसेच मागील वर्षभरापासून आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच नवीन पक्षाची घोषणा करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये गेल्या सुमारे १० महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य करण्यात आले आहे.
भाजपासोबत जागावाटप निश्चित करुन एकत्र निवडणूक लढवू
शेतकरी आंदोलनचा निकाल शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने लागला तर पंजाबमधील आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपासोबत जागावाटप निश्चित करुन एकत्र निवडणूक लढवू. तसेच आमच्यासारखी विचारसणी असणाऱ्या खास करुन दिंडसा आणि ब्रम्हपूरमधील अकाली गटांसोबत युतीचा विचार आहे, असे दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तर, तिसऱ्या ट्विटमध्ये अप्रत्यक्षरित्या नवज्योत सिंग सिद्धूंवर टीका केली आहे.
पंजाबमधील शांतता आणि सुरक्षेसाठी नवीन पक्ष
आताच्या घडीला पंजाबमध्ये राजकीय स्थैर्य आणि अंतर्गत तसेच बाहेरुन असणाऱ्या धोक्यापासून संरक्षण हवे असल्याने पक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी प्रयत्न करेन, आता या दोन्ही गोष्टी येथे नाहीत, असे अमरिंदर सिंग यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, भाजपने अमरिंदर सिंग यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजपने अमरिंदर सिंग यांना पंजाबमधील सर्वांत मोठे नेते असल्याचे म्हटले आहे. तर सुखदेव सिंग दिंडसा यांनी अद्याप अमरिंदर सिंग यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही असे म्हटले आहे. सुखदेव हे शिरोमणी अकली दलचे (संयुक्त) अध्यक्ष आहेत. दुसरीकडे अमरिंदर सिंग यांची पत्नी आणि खासदार परणीत कौर यांनी पक्ष सोडू नये म्हणून काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे समजते.