"कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच पंतप्रधान मोदींना भेटणार; केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 02:41 PM2021-09-30T14:41:36+5:302021-09-30T14:42:56+5:30
पंजाब काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी; माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
नवी दिल्ली: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात सुरू झालेल्या घडामोडी थांबताना दिसत नाहीत. नव्या मुख्यमंत्र्यांनी सूत्रं स्वीकारल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. त्यामुळे कॅप्टन काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते हरजीत गरेवाल यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
'कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. त्यानंतर त्यांना केंद्रात कृषिमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. कॅप्टन कोणती भूमिका बजावणार याचा निर्णय त्यांनी स्वत: घ्यायचा आहे. त्यांची भूमिका इतर कोणी ठरवू शकत नाही,' असं गरेवाल म्हणाले. कॅप्टन यांनी काल दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतील. यानंतर त्यांनी त्यांच्या एका निकटवर्तीयाच्या माध्यमातून काही कागदपत्रं पाठवली.
अमरिंदर सिंग काँग्रेस सोडणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे मी काँग्रेस पक्षात राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. अशा प्रकारचा अपमान मी सहन करणार नाही. ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये मला वागणूक मिळाली ती योग्य नाही. सध्यातरी मी भाजपामध्ये जात नाहीए, असं कॅप्टन म्हणाले.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले की, ज्या पद्धतीने आमदारांची बैठक बोलवून एनवेळी मला माहिती दिली गेली, मी तेव्हाच पद सोडत असल्याचे स्पष्ट केले होते. जर कोणाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या पदावर असण्याचा काय फायदा, असे ते म्हणाले.
नवज्योत सिंग सिद्धूवर त्यांनी टिपण्णी करताना म्हटले की, सिद्धू टीम प्लेअर नाहीय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी टीम प्लेअरची गरज आहे.