चंदीगढ:पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. पण, आता अखेर यावरचा सस्पेन्स संपला आहे. दोन दिवसांच्या विचारमंथन आणि बैठकांनंतर पक्षानं चरणजीत सिंग चन्नी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतानाही चरणजीत सिंग चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. तर, जाणून घ्या कोण आहेत चरणजीत सिंग चन्नी.
गांधी कुटुंबाशी आहे जवळचे संबंधकॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक नवज्योतसिंग सिद्धू आणि सुखजिंदरसिंग रंधवा यांच्याशिवाय सुनील जाखड, प्रताप सिंह बाजवा यांची नावे चर्चेत होती. पण, रविवारी सकाळी अचानक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांचे नाव समोर आले. पण, प्रकृतीचे कारण देत सोनी यांनी मुख्यमंत्री पदासाठी नकार दिला. त्यानंतर दुपारपर्यंत सुखजिंदर सिंग रंधावा यांचं नाव जवळपास निश्चित मानल जात होत. पण, पक्षाने या सर्व मोठ्या नेत्यांना बाजुला करत शर्यातीत नसलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. चन्नी हे गांधी कुटुंबाचे जवळचे मानले जातात.
अमरिंदर सिंग यांचे विरोधकचरणजीत सिंग चन्नी हे काँग्रेसचा पंजाबमधील दलित चेहरा आहे. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय होते, पण नंतर ते कॅप्टन यांच्या विरोधात गेले. 2017मध्ये चन्नी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री बनले होते. ते स्वत: 12 वी पास आहेत, त्यामुळे त्यांच्या पदाबाबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी 2017मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली होती.
चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदारचरणजीत सिंग चन्नी हे पंजाब राज्यातील चमकौर साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या चरणजीत सिंग यांचा सुमारे 12,000 मतांनी पराभव केला होता. त्यापूर्वी 2012 च्या निवडणुकीत त्यांनी सुमारे 3600 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. चरणजीत सिंग चन्नी हे युवक काँग्रेसशीही जोडलेले आहेत. त्याच काळात ते राहुल गांधींच्या जवळ आले.
पंजाब काँग्रेसचा दलित शीख चेहराचरणजीत सिंग चन्नी पंजाब काँग्रेसमधील महत्त्वाचा दलित शीख चेहरा मानले जातात. भारतात पंजाबमध्ये सर्वात जास्त दलित शीख आहेत. त्यांची संख्या सुमारे 32% आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, दलित शीख चेहरा असल्यामुळे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांना मुख्यमंत्री केलं आहे.