ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २३ - गरब्यावरुन बेताल वक्तव्य करण्याची मालिका सुरुच असून गरब्यावर राक्षसांनी कब्जा केला असून गरबा म्हणजे राक्षसांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे असे वादग्रस्त विधान सुफी इमाम मेहदी हुसैन यांनी केले आहे. विश्व हिंदू परिषद व शिवसेनेने याविरोधात आवाज उठवल्यानंतर व धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार केल्यानंतर पोलीसांनी मोलाना हसन यांना अटक केल्याचे वृत्त आहे.
अहमदाबादजवळील खेडा गाव येथील एका कार्यक्रमात हुसैन यांनी गरब्याविषयी बेताल विधान करुन नवीन वाद निर्माण केला. गरब्यामध्ये साधू व संत दिसत नाही. चित्रपटातील कलाकार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची मंडळी भडक कपड्यांमध्ये नाचताना दिसतात असे हुसैन यांनी म्हटले आहे. गरबा हा आता धार्मिक सण राहिलेला नसून तो राक्षसांच्या मनोरंजनाचा साधन बनला आहे असे त्यांनी सांगितले. लव्ह जिहादविषयी हुसैन म्हणाले, साडे चार लाख हिंदू तरुणींना मुस्लिम तरुणांनी फूस लावल्याचे काही जण सांगतात. मुस्लिम तरुणांना गरब्यामध्ये प्रवेशबंदी केली जाते. धार्मिक सणाविषयी असे भाष्य करणे योग्य आहे का असा सवालही हुसैन यांनी उपस्थित केला. हुसैन यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
काही वर्षांपूर्वी हुसैन यांनी नरेंद्र मोदींना मुस्लिम टोपी दिली होती व मोदींनी ती टोपी घालण्यास नकार दिला होता. यामुळे हुसैन हे चर्चेत आले होते. यानंतर लोकसभा निवडणुकीतही हुसैन मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी वाराणसीतही गेले होते.