ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 4 - पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय सैन्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या अमानुष कृत्याचा विरोध करताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या एका सैनिकाच्या बदल्यात पाकिस्तानच्या तीन सैनिकांचं शीर कापलं पाहिजे असं बोलले आहेत. 1965 च्या युद्धावेळी भारतीय सैन्य दलात रुजू असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देशाला पुर्णवेळ संरक्षण मंत्र्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
नायब सुभेदार परमजित सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांना पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने पूंछ भागात २५० मीटर आत येऊन ठार मारले व त्यांचा शिरच्छेद केला. यावर प्रतिक्रिया देताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भारताचं उत्तर एकदम स्पष्ट असलं पाहिजे असं म्हटलं आहे. त्यांना सांगितलं की, "आपल्याला सज्जनांच्या सेनेप्रमाणे वागणं बंद केलं पाहिजे. जर ते (पाकिस्तान) आपलं एक शीर कापतात, तर आपल्याला त्यांचे तीन शीर कापले पाहिजेत".
"पायाला जखम झाल्याने चालताना समस्या उद्धवत आहे, त्यामुळेच आपण नायब सुभेदार परमजित सिंग यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकलो नाही", असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. यावेळी बोलताना अमरिंदर सिंग यांनी छत्तीसगड आणि जम्मू काश्मीरमधील हिंसेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार मानलं नाही, मात्र देशाला पुर्णवेळ संरक्षण मंत्र्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं.