Ahmedabad Car Crash : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि काही लाईक्ससाठी आजची तरुणाई असं करते की ज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो. रील्स बनवण्याच्या नादात स्वतःच्या जीवाशी खेळत असल्याचाही विसर त्यांना पडतो. असाच काहीसा प्रकार गुजरामध्ये घडलाय. रील्सच्या नादात दोन तरुणांना कार अपघातात आपला जीव गमवावा लागला. तर तीन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अगदी तरुण वयातच मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अतिवेगाच्या थरारामुळे गुजरातच्या अहमदाबादमधील दोन तरुणांचा कार अपघातात जीव गेला आणि इतर तिघे जखमी झालेत. हे पाच तरुण, २२ ते २७ वयोगटातील होते. महत्त्वाची बाब म्हणजे हा सगळ्या धक्कादायक अपघाताचा थरार इन्स्टाग्राम लाईव्ह सुरु असताना झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातावेळी गाडीचा वेग तब्बल १६० किमी प्रतितास इतका होता.
गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील महामार्गावर ओव्हरस्पीडिंगमुळे हा अपघात झाला. अहमदाबाद येथील पाच तरुण मारुती सुझुकी ब्रेझा गाडीतून मुंबईला येत होते. गाडी सुरु असतानाच तरुणांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह करत आपल्या प्रवासाची माहिती दिली. कारच्या आत जोरात संगीताचा आवाज येत होता. कारमध्ये बसलेले दोन तरुण इंस्टाग्राम लाईव्हवर हॅलो म्हणाले. यानंतर कारमध्ये बसलेले इतर लोकही कॅमेऱ्यात दाखवले गेले. प्रत्येकजण मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत होता.
त्यानंतर,इन्स्टा लाईव्हमध्ये कारच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर कॅमेरा फोकस केला आणि एका तरुणाने म्हटलं की, पाहा कार कशी चालवत आहे. त्यावेळी कारचा वेग १६० किमी होता. त्यावेळी काही तरुण एकमेकांना शिवीगाळ करताना ऐकायला मिळत होते. दुसरीकडे कार चालवणारा तरुण इतर वाहनांना मागे टाकून भरधाव वेगाने कार चालवत होता. तरुण गाड्यांना ओव्हरटेक करत असताना मागे बसलेले त्याला तसे करण्यास अजून प्रोत्साहित करत होते. यानंतर अचानाक कारचा अपघात झाला. गाडी चालवणारा तरुण अपघात टाळण्यासाठी अचानक ब्रेक लावतो आणि इंस्टाग्राम लाइव्हमध्ये एक मोठा आवाज येऊन काळोख पसरतो.
दरम्यान, २ मे रोजी ही अपघाताची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात कारचालक अमन मेहबूभाई शेख आणि चिरागकुमार पटेल यांचा मृत्यू झाला. इतर तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व तरुण अहमदाबादचे रहिवासी होते. अहमदाबादपासून १०० किलोमीटर अंतरावर गाडीचा अपघात झाला होता.