लखनऊ: मोबाईलवर बोलता बोलता रस्ता ओलांडणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एका चौकात भरधाव कारनं तरुणाला धडक दिली. कारचा वेग जास्त असल्यानं तरुण बाचकला. तो मागे-पुढे झाला. मात्र कारनं त्याला जबरदस्त धडक दिली. कारचा वेग जास्त असल्यानं तरुण ८ फूट हवेत उडाला. या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ १७ जुलैचा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आलोक कुमार राय यांनी दिली. अपघातात अनिल उपाध्याय नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो जौनपूरचा रहिवासी होता. विजयनगरमधील एका खासगी कंपनीत तो कार्यरत होता. १७ जुलैच्या सकाळी तो मोबाईलवर बोलत बाराबिरवा चौक ओलांडत होता. त्याचवेळी एका भरधाव कार त्याच्या दिशेनं आली. कारनं अनिल जोरदार धडक दिली. त्यानंतर तो सात-आठ फूट हवेत उडाला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
गंभीर दुखापत झालेल्या अनिलला पोलीस रुग्णालयात नेत होते. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. अनिलचे भाऊ आकाश यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार क्रमांकाच्या आधारे पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.