उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक कार नियंत्रणाबाहेर जाऊन रामगंगा बॅरेजमध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीत पाच जण होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. तर, एक व्यक्ती कशीतरी गाडीची काच फोडून बाहेर आली, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
धुक्यामुळे वॅगनआर कार नियंत्रणाबाहेर जाऊन रामगंगा बॅरेजमध्ये पडल्याचं सांगण्यात येत आहे. खिडक्या न उघडल्याने पाण्यात बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी कारमधील एक तरुण कसा तरी काच फोडून बाहेर आला होता. तो कारच्या वर उभा राहिला आणि आरडाओरडा करू लागला, जो ऐकल्यानंतर स्थानिक लोकांना अपघाताची माहिती मिळाली.
हे संपूर्ण प्रकरण शेरकोट आणि अफजलगड सीमेवर असलेल्या रामगंगा बॅरेजचे आहे. जिथे रात्री उशिरा एक कार पडली. अफजलगडच्या पोलीस क्षेत्र अधिकारी अर्चना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरकोटच्या नूरपूर छिपरी गावातील रहिवासी खुर्शीद (35), मारूफ (19), फैसल (21), रशीद (20) आणि सिकंदर (26) हे प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते.
परतत असताना रात्री त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन हरेवली बॅरेजमध्ये पडली. खुर्शीद गाडी चालवत होता. तर पुढे सिकंदर बसला होता. उरलेली तीन मुलं मागे बसली होती. कार बॅरेजचे रेलिंग तोडून 30 फूट पाण्यात पडली. कारची खिडकी न उघडल्याने चार जण पाण्यात बुडाले, तर सिकंदर कसा तरी बाहेर आला. ज्या वॅगनआर कारचा हा अपघात झाला ती 10 दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती.