अहमदाबाद- गुजरातमध्ये पूर्णपणे दारूबंदी आहे. असं असताना वडोदरा-अहमदाबाद महामार्गावर अवैधपणे दारू घेऊन जाणाऱ्या एका गाडीचा अपघात झाला. या अपघातामुळे गाडीत असलेल्या सगळ्या बीअरच्या बाटल्या रस्त्यावर पसरल्या होत्या. त्यामुळे महामार्गापासून जवळच असलेल्या धूमद गावातील लोकांनी रस्त्यावर पडलेले बीअरचे कॅन उचलण्यासाठी मोठी गर्दी केली. रस्त्यावर पडलेल्या बीअरच्या कॅन्सवर लोक असरक्षः तुटून पडले आणि तिथे एक प्रकारे लूट सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
वडोदऱ्याला अहमदाबादने जोडणाऱ्या एक्स्प्रेस वेवर एक पांढऱ्या रंगाची मारूती सिलेरियो गाडीची धडक काळ्या रंगाच्या मर्सिडीज बेन्जला बसली. ही घटना धूमद नावाच्या एका छोट्या गावाजवळ घडली. या घटनेनंतर काही वेळातच तिथे लोकांनी गर्दी करत रस्त्यावर पडलेले बीअरचे कॅन्स पळविण्याचा प्रयत्न केला. पण या दोन्ही गाड्या नेमक्या कुणाच्या आहेत ? याबद्दलची माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे अपघातानंतर गाडीवर नंबर प्लेट नव्हत्या. गाड्यांची एकमेकांना धडक बसल्याने नंबर प्लेट पडल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे.
महात्मा गांधींचं गृह राज्य असलेल्या गुजरातमध्ये स्वातंत्र्यानंतर पूर्णपणे दारूबंदी आहे. गुजरातमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना आणि गुजराती व्यतिरिक्त इतर लोकांसाठी राज्यात एकमद कमी परवाने असलेली मद्याची दुकानं आहेत. तिथे आवश्यक परमिटनंतरच दारू मिळते. याचवर्षी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी दारूबंदीचे नियम आणखीन कठोर केले आहेत. नव्या कायद्यानुसार. जर कुणी दारून बनवताना, विकताना किंवा विकत घेताना पकडलं गेलं तर त्या व्यक्तीला 10 वर्षांचा तुरूंगवास किंवा पाच लाख रूपये दंड आकारला जाणार आहे.