कोल्हापूरमध्ये मुंबईच्या गाडीचा नंबर लावून वाहतुकीचे नियम मोडल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. असाच प्रकार नोएडामध्येही समोर येत आहे. गाडी मालक कार घेऊन गावी लग्नसमारंभाला गेलो होता, शहरात येताच त्याला ओव्हरस्पीडचा मेसेज आला, उघडून पाहिले तर एकाच नंबरच्या दोन गाड्या पाहून धक्का बसल्याचा प्रकार घडला आहे.
ओव्हरस्पीडचा २००० रुपये तीन दिवसांत भरा, असा मेसेज या कार मालकाला आला होता. आरटीओच्या एम परिवाहन अॅपवरून हा मेसेज आल्याने त्याने ते चलन ओपन करून पाहिले. तर या चलनावरील कारचा फोटो पाहून त्याला धक्का बसला. ती कारही दुसऱ्या कंपनीची परंतु एकसारख्याच क्रमांकाची होती. ही गाडी कोणाची होती याबाबत माहिती समोर आलेली नसून कार मालकाने नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास करत आहेत.
ज्या कारचे चलन काढले गेले ती त्याची कार नव्हती. सहा दिवसांसाठी ते झाशीला लग्नसमारंभाला गेले होते. चलन आल्यावर त्यांना आपल्य़ा कारच्या क्रमांकाची गाडी नोएडामध्ये फिरत असल्याचे समजले. यमुना एक्स्प्रेवेवर ओव्हरस्पीडमध्ये ही कार धावत होती. या कारचे फोटो स्पीड कॅमेराने टिपले आहेत. आपल्या गाडीचा नंबर वापरून काही गैरकृत्य तर केले जात नाहीय ना अशी भीती या मालकाला सतावत आहे.
अभिषेक असे या कारमालकाचे नाव आहे. त्याने २००० रुपयांचे आलेले चलन पोलिसांना दिले आहे. पोलिसांनी त्याची कागदपत्रे पडताळली आहेत. याची चौकशी करून चुकीचे आढळले तर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.