कार मालकाने भररस्त्यात पेट्रोल टाकून स्वतःची कार जाळली, 'हे' आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 18:27 IST2021-11-11T18:27:19+5:302021-11-11T18:27:37+5:30
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सध्या पोलिस कारच्या मालकाचा शोध घेत आहेत.

कार मालकाने भररस्त्यात पेट्रोल टाकून स्वतःची कार जाळली, 'हे' आहे कारण...
ग्वाल्हेर:मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका कारच्या मालकाने रागाच्या भरात पेट्रोल ओतून स्वतःची कार जाळल्याची घटना घडली आहे. स्वतःची कार जाळण्यामागे कारणही तसेच आहे. कारचे हफ्ते न भरल्यामुळे फायनांस कंपनीचे वसुली पथक कार घेऊन जात होते. यादरम्यान कारचा मालक आला आणि संतापाच्या भरात त्याने स्वतःची कार जाळली.
पेट्रोल टाकून कार जाळली
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ग्वाल्हेरच्या गोला मंदिर भिंड रोडवर ही घटना घडली. विनय शर्मा नावाच्या व्यक्तीने फायनांसवर कार विकत घेतली होती. पण, कारचे हफ्ते थकल्यामुळे कंपनीच्या वसुली पथकाने कार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर विनय शर्मा याने कार घेऊन न जाण्याचा इशारा दिला. पण, वसुली पथकाने न ऐकल्यामुळे संतापलेल्या कार मालकाने पेट्रोल टाकून भररस्त्यात स्वतःची कार पेटवून दिली. पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत कार जळून खाक झाली होती.
कार मालकाचा शोध सुरू
गाडीला आग लागल्याचे पाहून रस्त्यावरील लोकांनी तात्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. त्याचवेळी पोलिसही घटनास्थळी पोहोचले. या घटनेचे लाईव्ह व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहे. पोलिसांनी कार मालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.