नवी दिल्ली - सोशल मीडियावर एका अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. हा अपघात लखनौ-मुझफ्फरनगर हायवेवर झाला असून भरधाव वेगात असलेली कार अचानक पलटली. या कारच्या मागे राज्यमंत्री कपिल देव अग्रवाल हे देखील होते. अपघात होताच त्यांनी तात्काळ त्यांचा ताफा थांबवला आणि जखमींच्या मदतीसाठी स्वत: पुढाकार घेतला.
जखमींना त्यांच्याच एस्कॉर्ट वाहनातून मेरठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयातही पोहोचले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोक मंत्र्यांचं भरभरून कौतुक करू लागले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या कारमधील प्रवासी हे खतौली येथील रहिवासी असून ते खुर्जावरून परतत होते. याच दरम्यान कार चालकाला झोप लागली, त्यामुळे हा अपघात झाला. कारमध्ये एक महिला आणि तीन पुरुष होते. मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ते सकाळी लखनौहून मुझफ्फरनगरला परतत होते. याच दरम्यान त्याच्या समोरून धावणारी एक कार अचानक तीन-चार वेळा उलटून रस्त्याच्या पलीकडे गेल्याचं दिसलं."
"आम्ही आमची वाहने थांबवून जखमींना खतौली रुग्णालयात नेले. मात्र दुखापतीमुळे त्याला तेथून रेफर करण्यात आले. त्यानंतर जखमींना मेरठ टोलजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले". कपिल देव अग्रवाल म्हणाले की, ही नैतिक जबाबदारी असून माणुसकीच्या भावनेतून कोणी जखमी झाल्यास तातडीने उपचार मिळणेही गरजेचे आहे. सर्व जखमी आता ठीक असल्याचं त्यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.