Car Rammed : दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत कार घुसली, एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 09:50 AM2021-10-17T09:50:48+5:302021-10-17T09:52:16+5:30
Car Rammed Into People during Durga Idol Immersion Procession : उपस्थित लोकांनी कार चालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो पळून गेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
भोपाळ : छत्तीसगडच्या जशपूरनंतर आता मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये (Bhopal)धक्कादायक घटना घडली आहे. येथील बाजारिया पोलीस स्टेशन परिसरातील एका माथेफिरू तरुणाने भरधाव वेगाने कार दुर्गा माता मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत (Durga Mata Immersion Procession) घुसवली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या मिरवणुकीत लहान मुले, वयोवृद्ध आणि महिलाही सहभागी झाल्या होत्या. उपस्थित लोकांनी कार चालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो पळून गेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. उपस्थित लोक संतापल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. यावर पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पण, संतप्त लोकांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांच्या या कारवाईनंतर वातावरण अधिकच तापले.
शनिवारी रात्री 11:15 वाजता भाविक दुर्गा विसर्जनासाठी स्टेशन परिसर बाजारिया येथे जात होते. इतक्यात मागून एक भरधाव कार मिरवणुकीत घुसली. यामुळे झालेल्या धावपळीनंतर कार मागे घेऊन चालकाने पळ काढला. यानंतर उपस्थित जमावाने गोंधळ सुरू केला. दुसरीकडे, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, यामुळे भाविकांनी पोलीस स्टेशन बाजारियासमोर चक्काजाम आंदोलन केले.
#WATCH Two people were injured after a car rammed into people during Durga idol immersion procession in Bhopal's Bajaria police station area yesterday. Police said the car driver will be nabbed.#MadhyaPradeshpic.twitter.com/rEOBSbrkGW
— ANI (@ANI) October 17, 2021
भोपाळचे डीआयजी इर्शाद वली यांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी विसर्जन मिरवणूक स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या समोरून जात होती, यावेळी चांदबार बाजूने वेगाने येणारी कार लोकांना धडक देत मिरवणुकीत घुसली. जोपर्यंत लोकांना काही समजत नाही तोपर्यंत कार चालकाने वेगाने कार मागे घेत तेथून पळ काढला. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत.
जशपूरमध्ये कारने अनेकांना उडवले
दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या जशपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरून जात असलेल्या दुर्गा माते मिरवणुकीत कार घुसल्याने 4 जणांचा मृत्यू झाला, तर वीसहून अधिक जण जखमी झाले. कार अचानक मिरवणुकीत घुसल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. उपस्थित लोक संतापल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. उपस्थितांनी लोकांना चिरडणारी कार पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकासह दोघांना अटक केली आहे.