पाटणा - बिहारमधील मुजफ्फरपूर येथे भरधाव वेगाने जाणारी बोलेरो कारने 33 शाळकरी मुलांना चिरडलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामधील नऊ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर बिहारमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. ही घटना मुजफ्फरपूर जिल्ह्यातील झपहा येथे घडली आहे. मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त करत मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना चार-चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेतून निघण्याची तयारी करत होते. यावेळी एक बोलेरो कार नियंत्रण सुटल्याने थेट शाळेच्या आवारात घुसली. अनपेक्षितपणे भरधाव वेगाने येणा-या बोलेरोखाली 33 विद्यार्थी आले. यामधील गंभीर जखमी झालेल्या नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. इतर विद्यार्थ्यांना एसकेएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीन विद्यार्थ्यांची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.
मृत पावलेले सर्व विद्यार्थी मिनापूरमधील धर्मपूर केंद्रीय विद्यालयात शिकत होते. घटनास्थळी उपस्थित लोकांनी अपघातानंतर चालकाने पळ काढल्याचं सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली. नेहमी विद्यार्थ्यांच्या आवाजाने गजबजणारा हा परिसर, मात्र आज ही जागा पालकांच्या हुंदक्यांनी घेतली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. सोबतच चार-चार लाखांची मदत जाहीर केली आहे.