ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - तरुणी, महिला यांच्यावर छाप पाडण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबणाऱ्यांची या जगात कमतरता नाही. पण 65 वर्षांच्या एका रंगेल इसमाने तर महिलांना इम्प्रेस करण्यासाठी कहरच केलाय. आपली प्रेयसी दुसऱ्या व्यक्तीकडील आलीशान कारमुळे आकर्षित होऊन आपल्याला सोडून गेल्याने त्याने महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा कारचोरीचा फंडा सुरू केला. मात्र अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
राज भाटिया असे या कारचोरट्याचे नाव असून, तो गेल्या नऊ वर्षांपासून दिल्लीतील पालम विहार परिसरात राहत होता. राज भाटिया हा अट्टल चोरटा आहे. तसेच त्याच्यावर दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये कार चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच कारचोरीच्या आरोपाखाली त्याला याआधी तुरुंगवासही घडलेला आहे. त्याच्यावर मोकाअंतर्गत गुन्हाही दाखल आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डीसीपी विजय कुमार म्हणाले, "पोलिसांनी एक क्रेटा कार चोरीस गेल्यानंतर तपासास सुरुवात केली. त्यानंतर भाटिया आणि त्याच्या सहकाऱ्यांविषयी माहिती आमच्या हाती लागली. हे लोक पालम विहारमधील एका पार्कमध्ये चोरून आणलेल्या गाड्या ठेवत असत. त्यानंतर या पार्कबाहेर अनिल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिसांना पाळत ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते."
अखेरीस हा कारचोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आपल्याकडे एक युनिक इलेक्ट्रॉनिक चावी असून, त्याद्वारे कारचे लॉक तोडून आपण कारचोरत असल्याचे अटक करण्यात आल्यानंतर राज भाटिया आणि त्याच्या सहकारी टोळक्याने सांगितले. चोरी करण्यात आलेल्या कारचा उपयोग आपण महिलांना इम्प्रेस करण्यासाठी करायचो. त्यानंतर या कार पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एक ते दीड लाख रुपयांना विकायचो, अशी कबुलीही त्याने दिली.