Bareilly News Today: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बरेली आणि बदाऊन जिल्ह्यांच्या सीमेवर भीषण रस्ता अपघात झाला. फरीदपूर-दातागंजला जोडणाऱ्या रामगंगा नदीवर नव्याने बांधलेल्या अपूर्ण पुलावरुन कार खाली कोसळली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (23 नोव्हेंबर) रात्रीची असल्याची माहिती आहे.
रविवारी (24 नोव्हेंबर) सकाळी खल्लापूर गावातील काही लोक रामगंगेच्या काठावर पोहोचले, तेव्हा हा अपघात उघडकीस आला. घटनास्थळी एक कार खड्ड्यात पडल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. गावकऱ्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर ते थक्क झाले. कारमधील तिन्ही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.
गुगल मॅपने केला घातपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील लोक गुगल मॅपच्या मदतीने दातागंजहून खल्लापूरमार्गे फरीदपूरला जात होते. गुगल मॅफने त्यांना पुलावर जाण्यास सांगितले, पण पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे कार खाली कोसळली. गाडी ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी होते, मात्र खड्ड्यात भरलेल्या पाण्यात रक्त पसरल्याने ते लाल झाले. अपघाताचे दृश्य इतके भीषण होते की, तेथे पोहोचलेले ग्रामस्थ चक्रावून गेले.
माहिती मिळताच फरीदपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. कौशल कुमार, विवेक कुमार आणि अमित कुमार, अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि एका लग्न समारंभातून घरी परतत होते.