मुंबई - जगभरात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशननंतर नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमची झोप उडेल, अशी बातमी आहे. कारण, प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल 62 हजार रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. नुकतेच अर्थ मंत्रालयाने सरकारवर असलेल्या कर्जासंबंधीचा तिमाही अहवाल दिला आहे. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सरकारवरील कर्ज वाढून 82 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
केंद्र सरकारवर असलेल्या कर्जाची ही रक्कम 82 लाख कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे देशातील 134 कोटी जनतेचा विचार केल्यास प्रत्येक देशातील नागरिकांवर जवळपास 62 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या अहवालानुसार गतवर्षी जूनपर्यंत सरकारवर हे कर्ज 79.8 लाख कोटी रुपये होते. त्यावेळेस प्रत्येक भारतीयावर 59 हजार 552 रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे केवळ तीन महिन्यात तुमच्यावरील कर्जात 2448 रुपयांची वाढ झाली आहे. तर सरकारवर तीन महिन्यात 2.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहे.
कच्च्या तेलांच्या किमतीत झालेली वाढ हे देशावरील कर्ज वाढण्याचे मूळ कारण आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयांची झालेली घसरण आणि अमेरिकी फेड-भारतीय रिझर्व्ह बँकांद्वारे व्याजदरांत झालेली वाढ, हेही या कर्जवाढीचे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान, सरकार आणि आपल्यावर असलेलं हे कर्ज आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था रिझर्व्ह फेडने नुकतेच व्याज दरांत वाढ केली आहे. तसेच पुढील काळातही हे व्याजदर वाढले जाईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्ज आणखी वाढण्याची शक्यता आहे.