नवी दिल्ली - स्मार्टफोनच्या युगात मोबाईल गेमींगची क्रेझ भलतीच वाढली आहे. त्यात, लुडो गेमचा सर्रास वापर होताना दिसत आहे. अगदी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातही लुडो गेम खेळली जाते. विशेष म्हणजे पैसे लावून किंवा लुडो गेमचा जुगार म्हणूनही वापर करण्यात येत आहे. मात्र, तुम्ही पैशांवर लुडो गेम खेळत असाल तर तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. कारण, या गेम सॉप्टेवेअरमध्ये जाणीपूर्वक काही बदल घडवून आणण्यात येत आहेत.
लुडो गेम खेळणं हे जरी विरंगुळ्याचा साधन असलं तरी, तो जुगाराची भाग बनत चालला आहे. काही अट्टल जुगारींनी लुडो गेमच्या सॉफ्टवेअरमध्ये हवे तसे बदल केले आहेत. दिल्लीतून काही स्पेशल सॉफ्टवेअर या गेममध्ये टाकण्यात आले आहेत. जर तुम्ही या नवीन सॉफ्टवेअरने डाऊनलोड केलेल्या लुडो गेमसोबत खेळत असाल तर ही माहिती जाणून घ्या. कारण, या सॉफ्टवेअरनुसार तुम्ही संबंधित व्यक्तीसोबत गेम खेळताना तुम्ही सर्वप्रथम जिंकता. त्यामुळे तुमचा उत्साह वाढतो. मात्र, पुन्हा खेळताना तुमचा पराभव होतो. काही जुगाऱ्यांनी 25 ते 30 हजार रुपये खर्चून 2 स्मार्टफोनमध्ये दिल्लीतून एक सॉफ्टवेअर डाऊनलोड केले आहे. या दोनपैकी एका मोबाईलमध्ये लुडो गेम असून दुसऱ्यामध्ये रिमोट कंट्रोल. त्यामुळे एक व्यक्ती गेम खेळायला बसते, तर दुसरी व्यक्ती गेमचा रिमोट कंट्रोल हवा तसा चालवते. विशेष म्हणजे या रिमोटच्या सहायाने सलग 10 वेळा 6 अंक त्याच्या साथीदाराला पडतील अशी सोय करण्यात आली आहे. तर समोरच्या व्यक्तीची चालही आपल्याच मर्जीने चालवता येते. दरम्यान, याबाबत माहिती देताना एका जुगाऱ्याने सांगितले की, त्याचा एक शहरी दोस्त बस स्टँडजवळ 1 लाख रुपये हरला आहे. त्यामुळे पैस लावून जुगार खेळणाऱ्यांनी सावधान राहण्याची गरज आहे.