जोधपूर : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात भारताने खडतर विजय मिळविला होता. उंच डोंगर, पहाडांवर पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करत कब्जा केला होता. यामुळे त्यांना टिपणे भारतीय सैन्याला कठीण जात होते. तसेच उंचावरून खाली असलेले भारतीय जवान पाकिस्तानी सैन्यासाठी सोपे लक्ष्य बनत होते. अशावेळी जवानांच्या मदतीला बहाद्दूर योद्धा धावून आला. त्याने पाकिस्तानी सैन्याने ताबा घेतलेल्या जागांपेक्षा उंच जात एकेका सैनिकाला टिपले होते. आज हा योद्धा आपला निरोप घेतोय.
1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे. आज जोधपूरच्या हवाई तळावरून मिग-27 च्या स्क्वॉड्रनची सात विमाने आकाशात झेपावर देशवासियांचा कायमचा निरोप घेणार आहेत. संरक्षण खात्याचे प्रवक्ते संबित घोष यांनी सांगितले की, 27 डिसेंबरला सात मिग-27 विमाने जोधपूर हवाई तळावरून शेवटचे उड्डाण करणार आहेत. याच दिवशी ही विमाने सेवेतून बाहेर होणार आहे. यानंतर ही विमाने पुन्हा कधीही उड्डाण करणार नाहीत. ही मिग-27 ची शेवटची स्क्वॉड्रन आहे.
भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, कारण मिग-27 ही विमानांची तुकडी केवळ भारताचीच शेवटची नसून जगातील शेवटची तुकडी असणार आहे. कारण आता कोणताही देश या विमानांचा वापर करत नाही. या विमानांचे पुढे काय करणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे घोष यांनी सांगितले.
सेवेतून कमी केल्या गेलेल्या विमानांची शस्त्रास्त्रे आणि विमाने प्रदर्शनासाठी ठेवली जातात किंवा डेपोला दिली जातात. तर बऱ्य़ाचदा मित्र देशांना दिली जातात. जोधपूर एअरबेसवर दोन स्क्वॉड्रन होते. यापैकी एक याच वर्षी सेवेतून निवृत्त करण्यात आली आहे. आज उड्डाण करणारी विमाने हवेत झेपावून पुन्हा जमिनीवर उतरल्यानंतर त्यांना सलामी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मिग-27 चे सर्व पायलट हजर राहणार आहेत.