नवी दिल्ली: गुजरातच्या मुंद्रा बंदरावर गेल्याच महिन्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले होते. त्यानंतर आता अदानी समूहानं मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराणहून येणारे कंटनेर अदानी बंदर आणि सेझ हाताळणार नसल्याची माहिती अदानी पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्सनं दिली आहे.
गेल्या महिन्यात मुद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आढळून आले होते. त्यामुळे मोदी सरकार आणि अदानी समूहावर मोठी टीका झाली होती. यानंतर आता अदानी पोट्सकडून नियमावली जाहीर केली आहे. '१५ नोव्हेंबरपासून APSEZ इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानहून येणारी EXIM विभागात मोडणारं सामान हाताळणार नाही. APSEZकडून चालवण्यात येत असलेल्या सक्व टर्मिनल्सवर आणि सर्व APSEZ बंदरांवर पुढील सूचना प्रसिद्ध करेपर्यंत लागू असेल,' असं नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे. मुंद्रा बंदरावरून जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ अफगाणिस्तानातून आले होते. त्यानंतर अदानी पोर्ट्सकडून ही नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे ती अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आल्यापासून अंमली पदार्थांच्या तस्करीचं संकट आणखी तीव्र झालं आहे. १३ सप्टेंबरला गुजराच्या कच्छ जिल्ह्यात असलेल्या मुंद्रा बंदरात जवळपास ३ हजार कोटींचे अंमली पदार्थ सापडले होते. अफगाणिस्तानच्या कंदहारमधून अंमली पदार्थ इराणच्या अब्बास बंदरात आणले गेले. तिथून ते गुजरातच्या मुंद्रा बंदरात पाठवण्यात आले होते. यावरून विरोधकांनी अदानी समूहासह मोदी सरकारवर सडकून टीका केली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.