जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 9 कोटींचा टप्पा पार केला आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे काही देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक देश हे कोरोना लसीसाठी आता भारताकडे मदत मागत आहेत. भारताकडे मदत मागणाऱ्या या देशांच्या यादीमध्ये आता डोमिनिकन रिपब्लिकच्या नावाचाही समावेश झाला आहे. डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कॅरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. तसेच भारताने कोरोना लसीचे 70 हजार डोस मदत म्हणून पाठवावेत अशी मागणी केली आहे.
भारताने भूतान आणि मालदीव या देशांना कोरोना लसींचा पुरवठा केला आहे. भारत सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान स्कॅरिट यांनी पत्रात "जगाने 2021 मध्ये प्रवेश केल्यानंतरही आपल्या सर्वांची कोविड-19 विरोधातील लढाई सुरू आहे. डोमिनिकनमधील 72 हजार लोकसंख्येला कोरोना लसीची खूप गरज आहे. यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतो की, आमच्या देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या गरजेनुसार कोरोना लसीचे डोस मदत म्हणून पाठवून आम्हाला सहकार्य करावे" असं म्हटलं आहे.
"आमचा देश हा एक छोटसं बेट असून तो विकसनशील देशांपैकी एक आहे. कोरोना लसींसाठी सध्या जगभरात स्पर्धा सुरू असून या मोठ्या देशांच्या कोरोना लस मिळवण्याच्या स्पर्धेत आम्ही टिकणार नाही. त्यामुळेच भारताने आम्हाला मदत करावी" असं म्हणत पंतप्रधानांनी पत्राच्या माध्यमातून मदत मागितली आहे. डोमिनिकन रिपब्लिकचे भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जम्मू काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जा हटवण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर चीन पाकिस्तानचे समर्थन करत असतानाच कॅरेबियन बेट समुहांमध्ये असणाऱ्या या देशाने भारताची बाजू घेतली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आधीच जागतिक स्तरावरील जबाबदारी ओळखून भारत अनेक देशांना कोरोना लसीसाठी मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे.