मुजफ्फरनगर : येत्या प्रजासत्ताक दिनापासून शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार, बस आणि मोटारसायकली देशाच्या रस्त्यांवर धावताना दिसतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, पश्चिम उत्तर प्रदेश हे ऊस उत्पादक क्षेत्र असतानाही येथे उसाची वसुली आणि उत्पादन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना दोन उसांमध्ये सहाऐवजी आठ इंचाचे अंतर ठेवावे आणि या मधल्या जागेत खाद्यान्न पेरावे. उसापासून साखर तयार होते आणि उसाच्या चिपाडांपासून इथेनॉल तयार केले जात आहे. आता ब्राझीलप्रमाणे भारतातही इथेनॉलवर कार, बस आणि मोटारसायकली चालताना दिसतील. येत्या २६ जानेवारीपासून हा प्रयोग केला जाणार आहे.इथेनॉलने वाहन चालविण्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त होईल. या संदर्भात वाहन बनविणाऱ्या काही कंपन्यांनी इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकली तयार केल्या आहेत, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात ५० भाजप कार्यकर्त्यांना इथेनॉल पंपसाठी परवाना देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनाही असे परवाने दिले जातील. केंद्र सरकार शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी धोरण आखत आहे. त्यासंदर्भात ११ ते १४ डिसेंबर या काळात नागपुरात एका कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात देशभरातील अडीच लाखांवर शेतकरी भाग घेतील. त्यात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, पीकचक्र बदलणे आणि शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळवून देणारी पिके घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल व साखर कारखान्यांची एकाधिकारशाही संपुष्टात येईल, असे गडकरी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
कार, बस आणि मोटारसायकल इथेनॉलवर धावणार
By admin | Published: November 30, 2015 1:01 AM