चेन्नई - सरकावर टीका केली म्हणून व्यंगचित्रकारावर कारवाई करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार समोर आला आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारविरोधात आवाज उठवला म्हणून व्यंगचित्रकार जी बाला यांना तामिळनाडूच्या पोलिसांनी तिरुनवेली येथून अटक केलीये. व्यंगचित्रातून जी बाला यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांवर ताशेरे ओढले होते. जी बाला यांनी दोन आठडयांपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या कुटुंबाच्या मृत्यूसाठी या अधिका-यांना जबाबादार धरलं होतं.
ज्या व्यंगचित्रासाठी जी बाला यांना अटक करण्यात आलीये, ते त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलं होतं. एका कुटुंबाच्या मृत्यूसाठी जी बाला यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना जबाबदार धरलं होतं. दोन आठवड्यापूर्वी एका सावकाराच्या जाचामुळे कामगाराने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कुटुंबासहित आत्मदहन केले होतं. गेल्या दोन महिन्यांत या कुटुंबाने सावकाराविरोधात सहा वेळा तक्रार केली होती. पण पोलिस आणि जिल्हाधिका-यांनी सावकारावर कोणतीही कारवाई केली नाही. शेवटी या कुटुंबाने दोन लहान मुलींसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केले. जी बाला यांना सरकारी व्यवस्थेवर टीका करत हे व्यंगचित्र काढलं होतं.
जी बाला यांच्या व्यंगचित्रात एक लहान मुल खाली जमिनीवर पडलेलं दाखवलं आहे. मुल जळत असतानाही मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त मात्र नोटांचा बंडल घेऊन स्वत:ची नग्नता लपवत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. जी बाला यांनी 24 ऑक्टोबर रोजी हे व्यंगचित्र पोस्ट केलं होतं. जवळपास 38 हजार लोकांनी हे व्यंगचित्र शेअर केलं आहे. जी बाला यांचे फेसबुकवर 65 हजार फालोअर्स आहेत.
तिरुनवेलीत एका जिल्हाधिका-याने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. जी बाला यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी, नेल्लईचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांवर ताशेरे ओढणारं व्यंगचित्र काढलं आहे. जी बाला प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बदनामीच्या गुन्हा मानणा-या आयसीपी 501 कलमाअंतर्गत बाला यांना अटक केलीये. जी बाला यांना अटक होताच ट्विटरवर #standwithCartoonistBala ट्रेंड होण्यास सुरुवात झाली होती.
या व्यंगचित्राची दखल घेत जिल्हाधिका-यांनी हे प्रकरण मुख्य सचिवांकडे सोपवलं आणि त्यानंतर पोलीस महासंचालकांनी जी बाला यांना अटक करण्याचे आदेश दिले. जी बाला यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा समोर आला आहे.