तिरुवनंतपूरम : विशेष सशस्त्र पोलीस पलटणीमधून ३,६३६ काडतुसेच गायब आहेत, असा निर्वाळा राज्य गुन्हे शाखेने तपासणीनंतर सोमवारी दिला. महालेखा नियंत्रकांच्या (कॅग) अहवालात १२,०६१ काडतुसे गायब असल्याचे म्हटले होते.गुन्हे शाखेचे प्रमुख टॉमिन थचनकरी यांनी पत्रकारांना सांगितले की, विशेष सशस्त्र पोलीस पलटणीमधून १२ हजार नव्हे, तर ३,६३६ काडतुसे गायब असल्याचे आढळले आहे. कॅगच्या अहवालास आमचा आक्षेप नाही. चौकशी करण्यास सांगण्यात आल्याने आम्ही याबाबत तपासणी केली.कॅगच्या अहवालात २५ रायफलीसुद्धा गायब असल्याचे म्हटले होते. तथापि, गुन्हे शाखेने बारकाईने तपासणी केली असताना ६४७ स्वयंचलित रायफलीसह विशेष सशस्त्र पोलीस पलटणीत एकूण ६६० रायफली आढळल्या. उर्वरित १३ रायफली मणिपूरमधील सशस्त्र दलाच्या पलटणीसाठी जारी करण्यात आल्या आहेत.गुन्हे शाखेने सोमवारी जिवंत काडतुसे, रायफली आणि एके-४७ रायफलींची मोजदाद केली असताना फक्त ३,६३६ काडतुसे येथून गायब असल्याचे आढळले. एके-४७ रायफलीचे फक्त नऊ काडतुसे गायब आहेत. कॅगने १,५७६ काडतुसे गायब असल्याचे म्हटले होते.>सीबीआय चौकशी मागणी फेटाळली...रायफली आणि काडतुसे गायब असल्याच्या कॅगच्या अहवालावरून सोमवारी केरळ विधानसभेत चांगला गदारोळ झाला. काँग्रेसप्रणीत विरोधी यूडीएफ आघाडीने याप्रकरणी केलेली सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी फेटाळून लावली. युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटच्या सदस्यांचा स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर यूडीएफच्या आमदारांनी सभागृहात फलक झळकावत घोषणा दिल्या. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्ण यांनी दुपारच्या भोजनाआधी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सीबीआय चौकशीचे औचित्य नाही. काडतुसे गायब झाल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. अन्य ११ जणांविरुद्ध विभागीय चौकशी केली जात आहे. पोलीस प्रमुखांना हटविणार नाही, असे मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले. मुख्यमंत्री पोलीस प्रमुखांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसचे सदस्य पी. टी. थॉमस यांनी केला.
पोलीस पलटणीतून काडतुसे गायब, केरळ गुन्हे शाखेचा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 3:57 AM