नवी दिल्ली : देशभरात सुरू असलेली कोरोनाची साथ कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे लक्षात घेऊन येत्या २९ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘चार्टर्ड अकाऊंटंट’च्या (सीए) विविध पातळ्यांवरील परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे ‘इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंटस् आॅफ इंडिया’ने जाहीर केले आहे.जुलैच्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले विद्यार्थी नोव्हेंबरमध्ये परीक्षा देऊ शकतील. त्यांनी नोव्हेंबरमध्ये परीक्षा दिली तरी ती वेगळी संधी मानली जाणार नाही. आधी जुलैच्या परीक्षेसाठी भरलेली फीच नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी भरली आहे, असे मानले जाईल आणि आधी सुटलेल्या विषयांचा लाभही त्यांना त्या परीक्षेत घेता येईल. इन्स्टिट्यूट म्हणते की, नोव्हेंबरच्या परीक्षा बहुधा १ नोव्हेंबरपासून सुरू होतील. नक्की तारीख त्या वेळच्या परिस्थितीनुसार ठरविण्यात येईल. जुलैमधील विद्यार्थ्यांना नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी नव्याने फॉर्म भरावा लागेल. मात्र, तो भरताना त्यांना हवे असल्यास परीक्षा देण्याच्या विषयांच्या ‘ग्रुप’मध्ये बदल करण्याचा पर्याय असेल.
‘सीए’च्या जुलैतील परीक्षा आता नोव्हेंबर परीक्षेसोबत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 3:38 AM