"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 02:47 PM2024-05-10T14:47:52+5:302024-05-10T14:50:13+5:30
Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून नवनीत राणाविरुद्ध शादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Case against MP Navneet Rana : लोकसभा खासदार आणि अमरावती मतदारसंघातील भाजपा उमेदवार नवनीत कौर राणा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून तेलंगणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून नवनीत राणाविरुद्ध शादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झहीराबादमध्ये नवनीत राणा यांनी काँग्रेसला मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे असल्याचे म्हटले होते. दरम्यान, नवनीत राणा यांचे हे विधान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले आणि अनुचित टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नवनीत राणा या भाजपाच्या उमेदवार बीबी पाटील यांच्या प्रचारासाठी जहीराबाद लोकसभा मतदारसंघातील संगारेड्डी येथे आल्या होत्या.
यादरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेशी नवनीत राणा यांनी संवाद साधला. यावेळी नवनीत राणा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच, लालू प्रसाद यादव यांच्यासारखे लोक संविधान रद्द करण्याबाबत बोलत आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससी आणि एसटी समाजाला आदर दिला आहे, असेही नवनीत राणा यांनी सांगितले.
#WATCH | Telangana: BJP leader Navneet Rana campaigns for party candidate from Zaheerabad Lok Sabha constituency BB Patil in Sangareddy.
— ANI (@ANI) May 7, 2024
She says, "... In the last five years, I have seen BB Patil work in his constituency. BJP call for 400 paar will be fulfilled and one seat out… pic.twitter.com/mWGJtE5sn0
नवनीत राणा म्हणाल्या, "गेल्या पाच वर्षांत मी बीबी पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात काम करताना पाहिले आहे. भाजपाचे ४०० ओलांडण्याचे लक्ष्य पूर्ण केले जाईल आणि ४०० जागांपैकी एक जागा झहीराबाद असेल. तसेच, काँग्रेसला मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करण्यासारखे आहे आणि मी त्याचा निषेध करण्यासाठी झहीराबादला आले आहे."
याचबरोबर, "संविधान रद्द करण्याबद्दल कोणी बोलत असेल तर ते लालू प्रसाद यादव यांच्यासारखे लोक आहेत. आता आम्हाला हे कोणाला सांगण्याची गरज नाही, पण आमच्या राष्ट्रपती या देशातील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या आदिवासी महिला आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदींनी एससी आणि एसटीला आदर दिला आहे", असे नवनीत राणा यांनी सांगितले.