शेतकरी फसवणूकप्रकरणी तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल देवळी येथील प्रकार : मदत यादीतील खाडाखोड भोवली
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
बोरगाव मंजू: नजीकच्या देवळी येथील तलाठ्याविरुद्ध नुकसानग्रस्त शेतकर्याची फसवणूक केल्याबाबतच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बोरगाव मंजू: नजीकच्या देवळी येथील तलाठ्याविरुद्ध नुकसानग्रस्त शेतकर्याची फसवणूक केल्याबाबतच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकाराबाबत देवळी येथील विलास यशवंत सदाशिव या शेतकर्याने बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीमुळे त्यांच्या शेतातील रब्बीच्या हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल विभागाकडून त्याचे सर्वेक्षण केल्यानंतर शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. त्यात विलास सदाशिव यांना १२ हजार रुपये एवढी मदत जाहीर झाली होती. या मदतीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंंकेच्या कानशिवणी शाखेत जमा करण्यात आली होती. दरम्यान तलाठी भारत श्रीकृष्ण ढोरे याने सदर मदतीच्या यादीत पांढर्या शाईने खाडाखोड करून त्या जागी दुसर्या शेतकर्याचे नाव टाकून त्याला लाभ दिला. ही बाब लक्षात येताच शेतकरी सदाशिव यांनी त्याबाबत तलाठी ढोरे यांना वारंवार विचारणा केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यामुळे सदाशिव यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी व आर्थिक मदत मिळावी, यासाठी २७ ऑक्टोबर रोजी अकोल्याच्या तहसीलदारांकडे व बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये तलाठी ढोरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तसेच याच प्रकाराबाबत सदाशिव यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कानशिवणी शाखेच्या व्यवस्थापकाकडे तलाठी ढोरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारींवरून झालेल्या चौकशीत तलाठी ढोरे यांनी विलास सदाशिव यांच्या नावाची खाडाखोड करून दुसर्या शेतकर्याला आर्थिक मदतीचा लाभ दिल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे बोरगाव मंजू पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी तलाठी भारत श्रीकृष्ण ढोरे यांंच्याविरुद्ध भा.दं.वि.चे ४६७, ४६८,४७१ व ४२० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार डी.के. आव्हाळे हे करीत आहेत. (वार्ताहर)