नवी दिल्ली : हादियाच्या शफीन जहान याच्याशी लग्न करण्याच्या निवडीबद्दल फाजील चौकशा करण्यापासून राष्ट्रीय तपासणी संस्थेने (एनआयए) दूर राहावे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले.हादियाचा पती शफीन जहान याने केलेल्या विनंतीवर न्यायालय सुनावणी घेताना वरील आदेश दिला. जहान हा २६ वर्षांचा असून, तो होमिओपॅथीचा विद्यार्थी आहे. हादियाने जहानशी लग्न करण्याच्या आधी हिंदू धर्म सोडून इस्लामचा स्वीकार केला. त्याबाबत एनआयएने न्यायालयात युक्तिवाद केला की, हादियाच्या मनावर बिंबविण्यात आले, तिला नवा धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. तिला सापळ््यात अडकविण्यासाठी लग्न ही युक्ती होती.एनआयए व हादियाचे वडील के. एम. अशोकन यांनी जहान हा मूलतत्त्ववादी गटांमध्ये भरती करण्याचे काम करणारा असल्याचा दावा केला होता. तुम्ही कोणतीही चौकशी करू शकता, परंतु तिने चांगल्या व्यक्तीशी लग्न केले की वाईट याची चौकशी करू शकत नाही.ती तिची निवड आहे, तिचा अधिकार असे सरन्यायाधीश म्हणाले. तिने चांगला पती निवडला की वाईट हे फक्त तिलाच माहीत. तिची निवड काय असावी, याबद्दल न्यायालय प्रश्न विचारू शकत नाही, असेही सरन्यायाधीशांनी नमूद केले.लग्न व आयुष्याच्या जोडीदाराबद्दलची निवड या गोष्टी गुन्हेगारी कटकारस्थाने, गुन्हेगारी आरोप व कृती यापासून वेगळी ठेवायला हवीत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.जहानची चौकशी करू शकता-जहान याची बाजू वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि वकील हॅरिस बीरन यांनी मांडली. एनआयएला जहानची चौकशी करू द्या, परंतु तुम्ही लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित करू शकत नाही. फक्त हादियालाच तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे न्या. दीपक मिस्रा म्हणाले.
लव्ह जिहाद: हादिया प्रकरण; पतीनिवडीचा अधिकार सज्ञान मुलीचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:18 AM