ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. 25 - अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करा असं आवाहन पोलीस करत असतात. मात्र अशाच प्रकारे एका जखमीला मदत करणं कारचालकाला चांगलंच महागात पडलं. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या साहिल बंसल याला पोलिसांचा आठमुठेपणा सहन करावा लागला आहे. सिग्नल तोडून जात असलेल्या दुचाकीने साहिल यांच्या गाडीला ठोकलं. माणुसकीच्या नात्याने साहिल यांनी जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात नेलं. दुसकीकडे घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी साहिलची कार जप्त केली. इतकंच नाही तर त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. आता साहिलने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ट्विट करत मदत मागितली आहे.
साहिलने दिलेल्या माहितीनुसार, तो ग्रेटर नोएडामधील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 16 एप्रिल रोजी तो आपल्या स्विफ्ट कारने स्पाईल मॉलमध्ये गेला होता. रात्री जवळपास 10.30 वाजता मॉलमधून निघून जात असताना एका वळणावर दुचाकीस्वाराने सिग्नल तोडला आणि साहिलच्या गाडीवर येऊन आदळला. या अपघातात साहिलच्या गाडीचं नुकसानही झालं. दुचाकीस्वार खूप जखमी झाला होता. माणुसकीच्या नात्याने साहिलने त्याला गाडीत घेऊन जिल्हा रुग्णालय गाठलं. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याची कार जप्त केली.
जेव्हा साहिल यांनी कारण विचारलं तेव्हा कारवाई करणं बाकी असून उद्या पोलीस ठाण्यात येऊन कार घेऊन जा असं सांगण्यात आलं. पण जेव्हा साहिल आपली कार घेण्यासाठी पोहोचले तेव्हा देण्यास नकार देण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जेव्हा त्यांनी आपली तक्रार नोंद करण्यास सांगितलं तेव्हा खटल्याची धमकी देण्यात आली. तेव्हापासून साहिल बस किंना ऑटोने ऑफिसला जात आहेत. पोलिसांचा आठमुठेपणा पाहून अखेर त्रस्त झालेल्या साहिल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ट्विट करत मदत मागितली आहे.