मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भीषण हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सैन्याच्या सुरक्षा दलांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हल्लेखोरांना जिवंत सोडले आणि घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त करून माघारी परतले. प्रसंगाचे भान राखून सुरक्षा दलांनी योग्य निर्णय घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
कांगलेई यावोल कन्ना ग्रुपचा एक मैतेई उग्रवादी ग्रुप आहे. मणिपूरमधील अनेक हल्ल्यामध्ये त्यांचे नाव आलेले आहे. शनिवारी ते इथम गावात लपल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती. यामुळे त्या गावातील नागरिकांना वाचविण्यासाठी तुकड्या रवाना झाल्या. या ठिकाणी डझनभर हल्लेखोर लपले होते. मात्र आर्मी आल्याचे पाहताच त्या गावातील महिलांनीच पुढाकार घेत त्यांना संरक्षण दिल्याचा प्रकार घडला.
दिवसभर या गावातील १५०० लोकांना समजाविण्याचे प्रयत्न करण्यात आले. लष्कराला या लोकांनी कारवाई करण्यापासून रोखले होते. जर सैन्याने कारवाई केली असती तर या नागरिकांनाही धोका होता. यामुळे सैन्याने या दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रे जप्त केली आणि माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
मणिपुरमध्ये आरक्षणावरून कोकी कुकी आणि मैतेई समाजामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. दोन समुदायांमध्ये 3 मे रोजी पहिला संघर्ष झाला, त्यानंतर राज्याच्या विविध भागात सातत्याने हिंसाचार होत आहे. जातीय हिंसाचारात आतापर्यंत सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53% लोक मेईतेई समुदायातील आहेत, जे इम्फाळ खोऱ्यात राहतात. तर, आदिवासी-नागा आणि कुकी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ भागात राहतात. जवळपास दोन महिने मणिपूर धुमसत आहे.