ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत 2050 मध्ये इंडोनेशियाला मागे टाकत पहिल्या स्थानावर असेल असे भाकित प्यू रिसर्च या संस्थेने केले आहे. जागतिक स्तरावर सध्या ख्रिश्चनांची संख्या सर्वाधिक असून मुस्लीम दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, मुस्लीमांचा जननदर ख्रिश्चनांपेक्षा जास्त असून 2055 ते 2060 च्या सुमारास मुस्लीम लोकसंख्या ख्रिश्चनांबरोबर होईल असा अंदाजही प्यूने व्यक्त केला आहे. येत्या 20 वर्षांमध्ये ख्रिश्चनांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांपेक्षा मुस्लीमांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांची संख्याही जास्त असेल. प्यू रिसर्च सेंटर डेमॉग्राफीच्या अंदाजानुसार 2030 ते 2035 या कालावधीत जन्माला येणाऱ्या मुस्लीमांची संख्या 22.5 कोटी असेल तर याच कालावधीत जन्माला येणाऱ्या ख्रिश्चनांची संख्या 22.4 कोटी असेल. अर्थात, या कालावधीत एकूण ख्रिश्चनांची संख्या जरी जास्त राहणार असली तरी पुढील 20 ते 25 वर्षात मुस्लीम लोकसंख्या ख्रिश्चनांना मागे टाकेल असा अंदाज आहे. 2055 ते 2060 या कालावधीत मुस्लीमांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या 23.2 कोटी असेल तर ख्रिश्चनांची संख्या 22.6 कोटी असेल. सध्या दिसत असलेल्या कलांवरून हे अंदाज बांधत असल्याचे प्यूने म्हटले आहे. उदाहरणार्थ, 2010 ते 2015 या कालावधीत जगात जन्माला आलेल्या मुलांमध्ये मुस्लीमांचा वाटा 31 टक्के आहे, तर जागतिक लोकसंख्येतील मुस्लीमांचा वाटा 24 टक्के आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त जननदर असल्यामुळे आणि ख्रिश्चनांमध्ये जननदर कमी असल्यामुळे दोघांमधला फरक हळूहळू कमी होईल आणि 2060 च्या सुमारास दोघांची संख्या समसमान असेल असा हा अंदाज आहे.
जागतिक स्तरावरील हा कल भारतामध्येही प्रतिबिंबीत होत आहे. सध्या मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत इंडोनेशिया प्रथमस्थानी आहे, मात्र 2050 मध्ये भारत मुस्लीम लोकसंख्य़ेच्या बाबतीत इंडोनेशियाला मागे सारत प्रथमस्थानी येईल असे भाकित प्यूने केले आहे.