ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - बलात्काराची राजधानी म्हणून ओळख बनलेली दिल्ली नोकरदार महिलांसाठीही सर्वात वाईट शहर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंडियन नॅशनल बार असोशिएशनने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून देशाच्या राजधानीत महिलांची सुरक्षितता आणि सन्मानाबद्दल अनेक गंभीर मुद्दे समोर आले आहेत.
दिल्लीत नोकरीच्या ठिकाणी महिलांबद्दल अश्लील टोमणे, अयोग्य पद्धतीने स्पर्श आणि लैंगिक सुखाची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. सर्वेमध्ये 6092 प्रकरणाचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 63 टक्के प्रकरणे एकटया दिल्लीतील होती. त्याखालोखाल मुंबई आणि बंगळुरुचा क्रमांक लागतो.
आयटी सेक्टरमध्ये नोकरदार महिलांचा सर्वाधिक छळ होतो. त्यानंतर शैक्षणिक, मीडिया आणि कायदेशीर सेक्टरमध्ये काम करणा-या महिलांना त्रास दिला जातो. एप्रिल ते ऑक्टोंबर 2016 या कालावधीत हा सर्वे करण्यात आला. कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळाबद्दल ज्या महिला आवाज उठवतात त्यांच्या तक्रारीकडे कंपनीच्या वरिष्ठ स्तरावरुन दुर्लक्ष केले जात असल्याचे सर्वेमधून समोर आले. तक्रार केल्यानंतर कंपनीतील अंतर्गत समित्या निपक्षपातीपणे वागत नाहीत असे पीडित महिलांनी सांगितले.