नवी दिल्ली : हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी भोलेबाबा याच्याविरोधात पहिला खटला पाटण्यात दाखल करण्यात आला. भाजप नेते कृष्णकुमार सिंह कल्लू यांनी त्याच्या विरोधात पाटण्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये हा खटला दाखल केला.
वकील रविरंजन दीक्षित यांनी सांगितले की, या खटल्याचे कामकाज सुरू होताच साक्षीदारांची तपासणी होईल. हाथरसमध्ये नेमके काय घडले यावर या खटल्यातून प्रकाश पडण्याची शक्यता आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सुमारे चार दिवस भोलेबाबा याचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता. त्याने शनिवारी अखेर मौन सोडले व प्रसारमाध्यमासमोर हजर झाला.
घटनेने झालो अतिशय दु:खी : भोलेबाबा
हाथरस येथे सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेने मी अतिशय दु:खी झालो असे भोलेबाबाने म्हटले आहे. त्याने एका वृत्तसंस्थेला शनिवारी मुलाखत दिली. दुर्घटना झाल्यानंतर प्रथमच भोलेबाबा प्रसारमाध्यमांसमोर शनिवारी आला होता. त्याने सांगितले की, आपला सरकार व प्रशासनावरील विश्वास कायम राखणे आवश्यक आहे. कार्यक्रमात ज्यांनी गोंधळ निर्माण केला त्या लोकांवर कडक कारवाई होईल यात शंकाच नाही. घटनेत मरण पावलेल्यांचे कुटुंबीय तसेच जखमी व्यक्ती यांना मदत करण्याचे आवाहन भोलेबाबाने आपल्या अनुयायांना केले आहे.
मनरेगात देवप्रकार ज्युनिअर इंजिनीअर होता
हाथरसमधील सत्संग कार्यक्रमाचा देवप्रकाश हा मुख्य आयोजक आहे. ताे देवप्रकाश मधुकर पूर्वी मनरेगा योजनेत इटाह जिल्ह्यात २०१० सालापासून ज्युनिअर इंजिनीअर म्हणून कंत्राटी तत्त्वावर काम करत होता. तो भोलेबाबाच्या संस्थेशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित आहे. कार्यक्रम आयोजित करणे, निधी गोळा करणे ही कामे तो करीत असे. त्याने व इतर सेवेकऱ्यांनी सत्संग ठिकाणी पोलिसांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास मनाई केली होती. त्या कार्यक्रमाची छायाचित्रे, व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सर्वांना मनाई केली होती.