नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारमहुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी आज महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या आचार समितीसमोर आपली बाजू मांडली आहे. यावेळी महुआ मोईत्रा आणि विरोधी खासदारांनी आचार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. त्यामुळे भाजपने जोरदार हल्लाबोल केला. महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, हा इतिहासातील काळा दिवस आहे.
निशिकांत दुबे म्हणाले, "मी दोन कारणांसाठी पत्रकार परिषद घेतली नाही. पहिली गोष्ट म्हणजे या प्रकरणाची चौकशी लोकसभेची आचार समिती करत आहे आणि दुसरे म्हणजे राजकारणात विचार करून असे निर्णय घेतले जातात. संसदेच्या इतिहासातील आजचा काळा दिवस आहे." दरम्यान, लोकसभेच्या आचार समितीचे सदस्य असलेले विरोधी खासदार सुद्धा महुआ मोईत्रा यांच्यासोबतच्या बैठकीतून बाहेर गेले. तसेच, आचार समितीचे अध्यक्ष विनोदकुमार सोनकर यांच्यावर महुआ मोईत्रा यांना अनैतिक प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला.
निशिकांत दुबे यांनी पुढे असा दावा केला की, नीती समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर हे खालच्या जातीतील आहेत. या कारणावरून त्यांना विरोध केला जात आहे. महुआ मोईत्रा यांनी काही पैशांसाठी आपला विवेक पणाला लावला. महुआ मोईत्रा यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. याच संसदेत आपण खासदारांना १० हजार रुपयांची लाच घेऊन बडतर्फ करताना पाहिले आहे. महुआ मोईत्रा लिपस्टिक मागवत असतील तर त्यांना हाच प्रश्न विचारला जाईल. हे सर्व त्यांनी वैयक्तिक प्रश्न मानले आहेत, असा आरोप निशिकांत दुबे यांनी केला.
आरोप सिद्ध झाल्यास काय होणार?जर महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर ते संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. ज्यामुळे महुआ मोईत्रा यांच्यासाठी संभाव्यतः मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. महुआ मोईत्रा यांचे म्हणणे आहे की, कथित गुन्हेगारीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आचार समिती योग्य मंच असू शकत नाही. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांची उलटतपासणी करण्याची परवानगी मागितली आहे.
काय आहे प्रकरण?भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली होती. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला होता. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनीही मोठा खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचेही दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.