नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारमहुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीने २ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. दरम्यान, ५ नोव्हेंबरनंतर चौकशीसाठी हजर राहण्याची महुआ मोईत्रा यांनी आचार समितीकडे परवानगी मागितली होती. मात्र, ती परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना २ नोव्हेंबरला नियोजित वेळेवर म्हणजेच सकाळी ११ वाजता आचार समितीसमोर चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे.
दरम्यान, महुआ मोईत्रा यांच्या एकूण संपत्तीबाबतही विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, २०१३-१४ या आर्थिक वर्षात महुआ मोईत्रा यांचे उत्पन्न १ लाख ९२ हजार ६०० रुपये होते. त्यानंतर महुआ मोईत्रा यांची कमाई ५ लाख ३३ हजार ७० रुपये झाली. यानंतर २०१५-१६ या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न ५ लाख ३४ हजार ५३० रुपये होते, तर २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही रक्कम वाढून ८ लाख ३७ हजार १५६ रुपये झाली आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाढून ९ लाख ९९ हजार ९० रुपये झाली.
कोणत्या बँकेत किती रुपये?निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, माहिती देताना महुआ मोईत्रा यांच्याकडे ५ हजार रुपये रोख होते. तसेच, यामधील माहितीत महुआ मोईत्रा यांची देशातील तसेच परदेशातील बँकांमध्ये खाती असल्याचे सांगण्यात आले आहे. लंडन बँकेतील सर्व खात्यांपैकी १ लाख ३० हजार ७८२ रुपये आहेत. तर देशातील कोलकाता येथील गरियाहाट येथील एका बँक खात्यात १ कोटी १२ लाख १२ हजार ३५ रुपये आहेत. याशिवाय, महुआ मोईत्रा यांच्याकडे हिऱ्यापासून सोन्या-चांदीपर्यंतचे सर्व दागिने आहेत. २५ लाख रुपयांचा एक आर्ट पीस आहे. एकूण रक्कम २ कोटी ६४ लाख ९५ हजार २५० रुपये आहे.
कर्जाची रक्कम किती ?तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरही काही कर्ज आहे. यासंदर्भात माहिती देण्यात आली, त्यावेळी त्यांच्यावर बँकेतील कर्जाची थकबाकी ६ लाख ७१ हजार १३८ रुपये ४० पैसे होती. मात्र, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही.