नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीने २ नोव्हेंबरला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
याआधी लोकसभेच्या आचार समितीने महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. मात्र, महुआ मोईत्रा यांनी ३१ ऑक्टोबरला हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकाचे कारण देत हजर राहण्यासाठी आचार समितीकडे आणखी वेळ मागितला होता. मात्र, आता आचार समितीने महुआ मोईत्रा यांना २ नोव्हेंबरला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
महुआ मोईत्रा यांनी आरोपांच्या संदर्भात लोकसभेच्या आचार समितीच्या पहिल्या समन्सला उत्तर देताना सांगितले होते की, ५ नोव्हेंबरनंतर आचार समितीच्या पसंतीच्या कोणत्याही तारखेला व वेळेत समितीसमोर प्रत्यक्ष हजर राहू शकते. दुर्गा पूजा उत्सवाचा संदर्भ देत महुआ मोईत्रा यांनी म्हटले होते की, "मी पश्चिम बंगाल राज्याचे प्रतिनिधित्व करते, जिथे दुर्गा पूजा हा सर्वात मोठा सण आहे. माझ्या क्षेत्रातील अनेक पूर्व-नियोजित विजयादशमी बैठकांना (सरकारी आणि राजकीय दोन्ही) उपस्थित राहण्यासाठी मी आधीच वचनबद्ध आहे".
दरम्यान, याआधी लोकसभेच्या आचार समितीने गृहमंत्रालयाकडे महुआ मोईत्रा यांच्या गेल्या पाच वर्षांतील परदेश दौऱ्यांचा तपशील मागवला होता. महुआ मोईत्रा देशाबाहेर कुठे गेल्या? आणि त्यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली की नाही? याची चौकशी आचार समिती करणार आहे. यानंतर, त्यांचे लॉगिन त्यांच्या एमपी आयडीला जोडले जाईल. तसेच, महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित वादात आयटी मंत्रालयाकडून आधीच माहिती मागवण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?निशिकांत दुबे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच, लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचेही दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेची आचार समिती स्थापन केली आहे. दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि लोकसभेच्या आचार समितीच्या 'प्रश्नांची उत्तरे' देण्यास तयार आहे, असे महुआ मोईत्रा यांनी सांगितले आहे.