नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारमहुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला आहे. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी तृणमूल काँग्रेस (TMC) खासदारमहुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी कबूल केले.
एका स्वाक्षरी केलेल्या प्रतिज्ञापत्रात दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले की, महुआ मोईत्रा यांनी नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी गौतम अदानींवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या निष्कलंक प्रतिष्ठेमुळे विरोधकांना त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी मिळाली नाही. तसेच, केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचे दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले आहे. मात्र, महुआ मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानी यांचा दावा फेटाळून लावला आहे. त्या म्हणाल्या की, दर्शन हिरानंदानी यांनी सरकारच्या दबावाखाली हे वक्तव्य केले आहे. सरकारने त्यांचा व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, स्वाक्षरी केलेल्या प्रतिज्ञापत्रात दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले की, अदानींना टारगेट करण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर करण्यात आला होता. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी खासदाराच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचे दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. तसेच, महुआ मोईत्रा यांनी प्रश्न विचारण्याबद्दल अनेक मागण्या केल्याचा दावा दर्शन हिरानंदानी यांनी केला. यामध्ये महागड्या लक्झरी वस्तू, दिल्लीतील त्यांच्या वाटप केलेल्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी मदत, प्रवास आणि सुट्टीचा खर्च यांचा समावेश होता. याशिवाय, भारतामध्ये आणि जगाच्या विविध भागांमध्ये प्रवासासाठी लॉजिस्टिकल मदतही घेण्यात आली होती.
दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी लोकसभा सभापतींना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंबईतील एका व्यावसायिकाच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. तसेच, यानंतर निशिकांत दुबे यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवरील लॉगिनचा मुद्दा उपस्थित केला. निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेच्या वेबसाईटच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची चौकशी करण्याची मागणी केली.
मुंबईतील एका व्यावसायिकाच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. तसेच, यासाठी महुआ मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्या असून यासंदर्भात वकील जय अनंत देहाद्राई यांनीही आपल्याला पुरावे दिले आहेत, असे निशिकांत दुबे यांनी दावा केला होता. तसेच, महुआ मोईत्रा यांनी संसदेत एकूण ६१ पैकी ५० प्रश्न विचारले, जे सुरक्षेशी संबंधित होते, असे भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले होते. याशिवाय, ही बाब अत्यंत गंभीर आहे. जे पैशाच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारण्याशी संबंधित १२ डिसेंबर २००५ च्या 'कॅश फॉर क्वेरी' एपिसोडची आठवण करून देते. यामध्ये ११ खासदारांचे सदस्यत्व गमवावे लागले होते, असे निशिकांत दुबे म्हटले होते.