कानपूर - कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली असून, या धाडीमध्ये प्राप्तिकर विभागाला, नोटांनी भरलेली कपाटे सापडली आहेत. या नोटांचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की, गेल्या २४ तासांपासून येथील नोटांची मोजणी सुरू आहे. पीयूष जैन यांच्या घराबाहेर आतापर्यंन नोटांनी भरलेले सहा खोके ठेवण्यात आले आहेत. हे खोके प्राप्तिकर विभाग घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. घटनास्थळावर पीएसी बोलावण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत या धा्डीत तब्बल १५० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कन्नौजमधील अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या कानपूर येथील घरी डीजीजीआय आणि प्राप्तिकर विभागाने गुरुवारी धाड टाकली होती. यादरम्यान, कपाटांमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने त्यांची मोजणी करण्यासाठी मशीन मागवावी लागली. गेल्या २४ वर्षांपासून छापेमारी सुरू आहे. तसेच पीयूष जैन यांच्या घरामध्ये नोटांच्या राशी लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पहिल्यांदा ही धाड अहमदाबादच्या डीजीजीआय म्हणजेच जीएसटी इंटेलिजन्स महानिर्देशालयाच्या टीमने टाकली होती. मात्र जेव्हा पीयूष जैन यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली तेव्हा या धाडीमध्ये प्राप्तिकर विभागालाही सामील करून घेण्यात आले. नोटा मोजण्यासाठी चार मशिनी मागवाव्या लागल्या. तेव्हापासून गेल्या २४ तासांपासून येथे नोटांची मोजणी सुरू आहे.
या नोटा एवढ्या प्रमाणावर सापडल्या आहेत की त्या ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागाला आतापर्यंत ६ स्टीलचे मोठमोठे बॉक्स मागवावे लागले आहेत. या बॉक्समध्ये नोटा सील करून प्राप्तिकर विभाग घेऊन जाणार आहे. या धाडसत्राची कारवाई अद्याप संपलेली नाही.पीयूष जैन कन्नौजच्या एका अत्तर गल्लीमध्ये अत्तराचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायाची कार्यालये कन्नौज, कानपूर आणि मुंबईमध्ये आहेत. प्राप्तिकर विभागाला त्यांच्या सुमारे ४० हून अधिक कंपन्याची माहिती मिळाली आहे ज्यांच्या माध्यमातून ते अत्तराचा व्यापार करायचे.