नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील एका कारमधून 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगत भाजपा अरुणाचल प्रदेशात पैसे देऊन मते विकत घेत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत भाजपावर आरोप करताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पैसे जप्त केल्याचा व्हिडीओ सुद्धा प्रसिद्ध केला. हा सर्व प्रकार म्हणजे 'कॅश फॉर व्होट घोटाळा' असल्याचे सांगितले. तसेच, 'हा काळा पैसा आहे का?', असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, "हे सर्व चुकीचे आहे. 'कॅश फॉर व्होट' हे काम काँग्रेसच आहे. निवडणूक आयोगाच्या चौकशीत सर्व काही समोर येईल. आम्हाला माहिती मिळाली आहे की, भाजपा उमेदवाराच्या गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे."
बुधवारी रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमधून 1.80 कोटी रुपये जप्त करण्यात आले, यासंबंधीचा व्हिडीओ दाखविला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत चौकीदाराची चोरी पकडण्यात आली, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अरुणाचल प्रदेशात प्रचारसभा आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये जप्त करण्यात आलेल्या पैशांचा वापर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत लोकांची गर्दी वाढवण्यासाठी करण्यात येणार होता, असा आरोपही रणदीप सुरजेवाला यांच्याकडून करण्यात आला आहे.