नवी दिल्ली : बनावट बिलांच्या माध्यमातून कर चुकवेगिरी करणाऱ्या हवाला अथवा एन्ट्री ऑपरेटरांच्या विरोधात प्राप्तिकर विभागाने देशातील अनेक शहरांत धाडी टाकल्या असून, ६२ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, हा सर्व पैसा बेहिशेबी असून, अनेक ठिकाणांहून तो जप्त करण्यात आला आहे. संजय जैन हा त्यातील एक आरोपी आहे. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांतील ४२ ठिकाणी सोमवारी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यात ही रक्कम सापडली आहे. या धाडींत ५०० कोटी रुपयांचे हवाला रॅकेट आढळून आले आहे. सूत्रांनी सांगितले की, ही सर्व रक्कम २ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांमध्ये आहे. लाकडी कपाटे आणि फर्निचरमध्ये ही रक्कम दडवून ठेवण्यात आली होती. देशात प्रचंड मोठे एन्ट्री ऑपरेशन (हवालासारखे रॅकेट) राबविले जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्तिकर विभागास मिळाली होती. बनावट बिलांच्या माध्यमातून मोठी रोख रक्कम निर्माण केली जात असल्याचे कळाले होते. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. त्याआधी मंगळवारी प्राप्तिकर विभागाने एक निवेदन जारी करून कारवाईत २.३७ कोटी रुपयांची रोख रक्कम, २.८९ कोटी रुपयांचे दागिने आणि १७ बँक पासबुक जप्त करण्यात आल्याची माहिती दिली.
प्राप्तिकर विभागाच्या धाडीत ६२ कोटी रुपयांची रोख जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 3:28 AM