ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - कमी पैशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्येकानं सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येईल, असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. ते दिल्लीतील विज्ञान भवनात जनधन मेळ्यात बोलत होते. कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे सामान्य माणसांना समजले आहेत. मात्र विरोधकांना ते समजायला वेळ लागतो आहे. सर्वकाही रोख रकमेवर अवलंबून असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाल्यामुळे बनावट नोटांद्वारे दहशतवादाला चालना मिळत होती, असंही जेटली म्हणाले आहेत.दरम्यान, कॅशलेस अर्थव्यवस्थेचे लोकांना अधिकाधिक फायदे मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्यांच्याकडे एटीएम कार्ड किंवा मोबाईल नाही, अशांना ऑनलाइन व्यवहारासाठी थंब प्रिंटची सुविधाही उपलब्ध असणार आहे. कॅशलेस म्हणजे कमी कॅश, कॅश नाहीच असे नाही. लकी ग्राहक, डिजिधन योजनांमुळे देशाला कॅशलेस करण्यात मोठी मदत होणार आहे. जगभरात आर्थिक अस्थिरता सुरू असताना भारत आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर आहे. असाही एक काळ होता ज्यावेळी फक्त एक टक्के लोकांकडे मोबाईल होते, आज मात्र जवळपास ९० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. बँकिंग सिस्टीममध्ये पैसा आल्यावर अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल. देशाबाहेरील काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील संस्थांना संपूर्ण माहिती दिली, असंही यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे.
Our bid to go cashless means less cash not no cash,but our political counterparts are slow in understanding this&so is some of the media: FM pic.twitter.com/2fWiEYYnUH— ANI (@ANI_news) 25 December 2016