ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 -क्रेडिट डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना बँकांनी दिलासा दिला आहे. क्रेडिट डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर अधिकचं शुल्क आकारण्याचा निर्णय बॅँकांनी रविवारी रात्री मागे घेतला असून, या निर्णयानंतर आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपांवर क्रेडिट/डेबिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोलपंप मागे घेतला आहे.
बॅँकांनी कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर एक टक्के एमडीआर शुल्क आकारणे सुरू केल्यानंतर याच्या निषेधार्थ सोमवारी ९ जानेवारीपासून देशभरातील कोणत्याही पेट्रोल पंपावर क्रेडिट अथवा डेबिट कार्डावर इंधन न देण्याचा निर्णय ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन या पेट्रोल पंपचालकांच्या संघटनेने रविवारी जाहीर केला होता. केंद्र सरकारनं डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्यांना इंधनाच्या दरात ०.७५ टक्के सूट देण्याची योजना जाहीर केलेली असताना पेट्रोल पंपचालकांच्या या पवित्र्याने वाहन चालकांची तारांबळ उडणार होती. ९ जानेवारीपासून क्रेडिट कार्डाच्या सर्व व्यवहारांवर सरसकट एक टक्का व डेबिट कार्ड व्यवहारांवर ०.२५ ते एक टक्क्यांपर्यंत एमडीआर शुल्क आकारून ते पेट्रोल पंपचालकांच्या खात्यातून परस्पर वळते करून घेतले जाईल, असे एचडीएफसी व इतर बँकांनी आम्हाला कळविले. त्यानंतर आम्ही पेट्रोल पंपावर क्रेडिट अथवा डेबिट कार्डावर इंधन न देण्याचा निर्णय घेतला होता.