लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्त्यांवरील वाहन अपघातात जखमी झालेल्या लोकांना कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळण्याची योजना केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर चंडीगड, आसाममध्ये राबविण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.
ते म्हणाले की, मोटार वाहनांचा अपघात कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर झालेला असो, त्यातील रुग्णांना कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळतील, असे या योजनेचे स्वरूप आहे. आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये ही योजना लागू आहे. त्यात अपघात झाल्यानंतरच्या सात दिवसांपर्यंत कमाल दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची सुविधा आहे.
मृत्यूचे प्रमाण घटणार
उपचार मिळण्याच्या योजनेमुळे दुर्घटनेत मरण पावणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते, तसेच जखमींना अधिक उत्तम उपचार मिळू शकतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.