ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - धार्मिक व जातीय विद्वेषातून घडणा-या गुन्ह्यांमध्ये किंवा हेट क्राइममध्ये वाढ होत असून भारताचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी अशा गुन्हेगारांविरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. भारतात कायद्याचं राज्य चालतं आणि ते अबाधित रहावं म्हणून न्याययंत्रणा निकराचा प्रयत्न करत राहील, तसेच जातीय हिंसाचारातील गुन्हेगारांना कठोर शासन करण्यात येईल असंही टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दत्तू म्हणाले.
लोकांनी निवडून दिलेल्या प्रत्येक सरकारचं प्राथमिक कर्तव्य हे कायद्याचं राज्य अबाधित राखणं समाजात फूट पाडणा-यांपासून नागरीकांना संरक्षण देणं हे आहे. सध्याच्या सरकारवरही ही जबाबदारी आहे. मला खात्री आहे की सध्याचं सरकारही त्या दिशेनं प्रयत्न करत असून घटनेने नागरीकांना दिलेल्या मुलभूत अधिकारांटे जतन केले जाईल.
तोंड उघडायच्याआधी आपण काय बोलतोय याचा विचार करा अशा शब्दांमध्ये दोनच दिवसांपूर्वी गृहमंत्री राजनाथ सिंहांनी केंद्र सरकारातील काही वरीष्ठ नेत्यांची कानउघाडणी केली होती. सरनायाधीशांनी स्पष्ट शब्दांत व्यक्त केलेल्या या भूमिकेमुळे जातीय द्वेष पसरवणा-यांविरोधात कडक उपाय योजण्यासाठी राज्य सरकारांना बळ मिळेल अशी शक्यता आहे.