मुह में राम, बगल में छुरी : अरविंद केजरीवाल यांचा घणाघात
वाराणशी : ‘‘लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी यांना स्वत:ची ‘खालची जात’ आठवली आणि दलित-मुस्लिमांबद्दलचा कळवळाही त्यांना दाटून आला, ही सर्व ढोंगबाजी असून मोदी वैफल्यग्रस्त झाले आहेत, गुजरातमध्ये मुस्लिमांवर अत्याचार करणार्या मोदींचे चारित्र्य ‘मुह मे राम बगल में छुरी’ असेच आहे आणि ही गोष्ट देशवासियांनाही ठावूक आहे. पराभव जवळ दिसत असल्यानेच मोदींची ही केविलवाणी धडपड सुरु असल्याचा घणाघात आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज येथे केला. प्रचाराच्या अत्यंत व्यस्ततेतून वेळ काढून केजरीवाल यांनी ‘लोकमत’ला बुधवारी सकाळी विशेष मुलाखत दिली. वाराणशी मतदारसंघातील ग्रामीण भागात नागरिकांशी संवाद साधत असतानाच केजरीवाल यांनी तासभर ‘लोकमत’शी मोकळेपणाने चर्चा केली.
केजरीवाल म्हणाले की, आताच मोदींना मुस्लिमांचा कळवळा आला कसा ? निवडणुकीच्या काळात देशातील विविध राज्यांत मोदी गेले, त्या-त्या भाषिकांच्या टोप्या आणि अंगवस्त्रे त्यांनी घातली. परंतु मुस्लिमांची टोपी त्यांनी कधीही घातली नाही. फार काय तर अभिनेता रजनीकांतला भेटायला गेले तेव्हा ते लुंगी घालून गेले. मुस्लिम टोपीची अॅलर्जी असलेली, मुस्लिमांचा द्वेष करणारी व्यक्ती अचानक त्यांच्याबद्दल कळवळा व्यक्त करते, तेव्हा त्या मागील षडयंत्र सामान्य जनतेने ओळखले पाहिजे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल का, या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले,‘भाजपला १७० पेक्षा जास्त जागा मिळणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे सरकार येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही’. अशा वेळी तुम्ही कुणाला पाठिंबा देणार, या प्रश्नावर केजरीवाल काहीसे उसळले, ‘आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही’. सध्या गाजत असलेल्या महिला पाळत प्रकरणावर केजरीवाल यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारचे हे नाटक आहे. हे प्रकरण चार महिन्यांपासून सुरू आहे. त्याचवेळी सरकारने कारवाई का केली नाही? काँग्रेस व भाजपातील ही मिलिभगत आहे. तुम्ही रॉबर्ट वाड्राला सांभाळा आम्ही तुम्हाला सांभाळतो, अशी ही डील असल्याचा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला. वाराणशीच्या निवडणुकीबद्दल केजरीवाल म्हणाले की, ही लढाई मीच जिंकणार आहे. अजय राय हे काँग्रेस-भाजपाचे संयुक्त उमेदवार आहेत. राय व भाजपमध्ये सेटिंग झाले आहे.
मोदी विजयी झाले तर ते वाराणशीतून राजीनामा देतील व त्यानंतर होणार्या पोटनिवडणुकीत अजय राय हे भाजपचे उमेदवार राहतील. कुख्यात मुख्तार अन्सारीने काँग्रेसला दिलेला पाठिंबा हा राजकीय डावपेचाच एक भाग आहे. मुख्तारच्या पाठिंब्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फायदा मोदींनाच होणार आहे. मी जेथे जेथे जात आहे, तेथे तीन चतुर्थांश लोकं मोदींना हरविले पाहिजे असे मत व्यक्त करीत असल्याचा दावा केजरवाल यांनी यावेळी केला. ़़़अन केजरीवाल रस्ता भरकटले केजरीवालांसोबत ही मुलाखत सुरू असताना केजरीवाल यांचा ताफा इस्लामपूर-बेनीपूर रस्त्याने लागला होता. परंतु कार्यकर्त्यांची गफलत झाली आणि ताफा भलत्याच मार्गाने लागला. ही चूक लक्षात येताच वाहने मागे वळली आणि सभेच्या ठिकाणी पोहोचली. पण यामुळे काही क्षणासाठी पोलिसांची धांदल उडाली होती. मोदींचे जातीचे कार्ड भाजपा नेत्यांना रुचले नाही नरेंद्र मोदी यांच्या कुठल्याही विधानावर आक्रमक होऊन त्यांची पाठराखण करणारे भाजप नेते त्यांच्या खालच्या जातीच्या विधानावर गप्प का? असा सवाल करुन केजरीवाल म्हणाले की, मुळात भाजप नेत्यांना मोदींचे हे विधान आवडलेले नाही. संघ परिवारातही या विधानावर अस्वस्थता आहे. पण निवडणूक असल्याने कुणी बोलत नाही.भाजप आणि संघ परिवार एका व्यक्तिच्या अहंकारामागे फरफटत जात असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली.