काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रयागराज येथे संविधानाचा सन्मान आणि रक्षण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेताना आरक्षण आणि जातिनिहाय जनगणनेबाबत पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. या कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित करताना ९० टक्के लोक हे सिस्टिमच्या बाहेर आहेत. त्यांच्या भागीदारीशिवाय देश चालू शकत नाही. त्यासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उखडून टाकणार, असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावर आता बसपाच्या नेत्या मायावती यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस एवढी वर्षे सत्तेत राहिली, तेव्हा त्यांनी जातिनिहाय जनगणना का केली नाही, असा सवाल मायावती यांनी राहुल गांधी यांना विचारला आहे.
राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करताना मायावती म्हणाल्या की, काँग्रेस हा दुटप्पी भूमिका असलेला पक्ष आहे. याच काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान दिला नाही. बाबासाहेब हयात असताना आणि त्यांचं निधन झाल्यानंतरही त्यांना काँग्रेसने भारतरत्न सन्मान दिला नाही. एवढंच नाही तर काशीराम यांच्या निधनानंतर एक दिवसाचा दुखवटाही पाळला नाही. काँग्रेस पक्ष एवढी वर्षे सत्तेत होता, तेव्हा त्यांनी जातिनिहाय जनगणना केली नाही, असा सवाल मायावती यांनी विचारला. तसेच बसपा नेहमीच जातिनिहाय जनगणनेच्या बाजूने राहिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत काँग्रेसने पाळलेल्या मौनावरही मायावती यांनी टीका केली. एवढंच नाही, तर घटनात्मक पद्धतीने मिळाळेल्या एससी आणि एसटी आरक्षणामध्ये आता वर्गिकरण आणि क्रिमीलेयरच्या माध्यमातून त्याला निष्प्रभ करून संपुष्टात आणण्याच्या सुरू असलेल्या कटाविरोधात काँग्रेस, सपा आणि भाजपाने मौन बाळगलं आहे, हेच यांचं दलितप्रेम आहे का असा सवालही मायावती यांनी विचारला.