कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम

By श्रीनिवास नागे | Published: May 4, 2023 05:11 PM2023-05-04T17:11:45+5:302023-05-04T17:12:27+5:30

मुस्लीम आणि दलित समाजाची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरणार 

Caste Equations Matter in Karnataka Assembly Elections | कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम

कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम

googlenewsNext

श्रीनिवास नागे

विजयपूर : मुस्लीम समाजाचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करून लिंगायत आणि वक्कलिग समाजांना प्रत्येकी दोन टक्के आरक्षण वाढ, सरकार पुन्हा आल्यास राज्यात कट्टर हिंदुत्वाचे ‘योगी मॉडेल’ राबवण्याची घोषणा यातून भाजपने कर्नाटकात हिंदुत्ववादी मतांना पुन्हा चुचकारले आहे. त्यामुळे लिंगायत आणि वक्कलिग समाजाभोवती फिरणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीम आणि दलित समाजाची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहे.

कर्नाटकच्या कोणत्याही निवडणुकीत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरत असतात. राज्यात लिंगायत आणि वक्कलिग जातींचे सुरुवातीपासून प्राबल्य आहे. राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे ५० टक्के खासदार आणि आमदार या दोन जातींचेच राहिले आहेत. पक्ष कोणताही असो उमेदवारी देताना जातीय समीकरणे मांडून या दोन्ही जातींना प्राधान्य दिले जाते.

जातनिहाय लोकसंख्येची टक्केवारी

  • राज्यात दलितांची संख्या १९.५ टक्के 
  • अनुसूचित जमाती पाच टक्के 
  • मुस्लीम १६ टक्के 
  • कुरुबा सात टक्के, 
  • उर्वरित ओबीसी १६ टक्के, 
  • लिंगायत १४ टक्के, 
  • वक्कलिग ११ टक्के, 
  • ब्राह्मण तीन टक्के, 
  • ख्रिश्चन तीन टक्के, 
  • बौद्ध आणि जैन दोन टक्के आणि इतर चार टक्के 

राज्यातील एकूण २० टक्के ओबीसी समाजापैकी सात टक्के लोकसंख्या कुरुबांची आहे.

मुस्लीम समाजाचा प्रभाव

उत्तर कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा), बिदर, विजयपूर (विजापूर), रायचूर, धारवाड या जिल्ह्यांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. विधानसभेच्या कलबुर्गी उत्तर, पुलकेशीनगर, शिवाजीनगर, जयनगर, तुमकुर, चामराजपेट या मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो.

कळीचा मुद्दा

राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर मुस्लीम समाजाचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले. त्याचवेळी लिंगायत आणि वक्कलिगांना प्रत्येकी दोन टक्के आरक्षण वाढवून दिले. सत्तेतील मोठ्या वाट्यासोबत शैक्षणिक क्षेत्र आणि नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण वाढले आहे. त्यामुळे सत्तेच्या दोऱ्या हातात असलेल्या लिंगायत आणि वक्कलिग या ‘पॉवरफुल’ जातींची ताकद आणखी वाढली आहे. मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. या निर्णयात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

हिंदूविरोधकांचा ‘एन्काउंटर’ करू!

मुस्लिमांचे आरक्षण काढून घेतल्याचा मुद्दा भाजप वारंवार प्रचारात आणत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावर भर देत आहेत. भाजपचे ‘फायरब्रँड’ नेते बसनगौडा पाटील- यतनाळ यांनी तर राज्यातील हिंदूविरोधक आणि राष्ट्रविरोधकांना मारले जाईल, अशी थेट धमकी दिली आहे. हिंदू धर्माच्या आणि देशाच्या विरोधकांचा ‘एन्काउंटर’मध्ये खात्मा करू, असे यतनाळ भाषणांमध्ये सांगतात.

कोण आहेत यतनाळ?

विजयपूर शहरातील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील- यतनाळ १९९४ पासून आमदार- खासदार आहेत.
वाजपेयी सरकारमध्ये ते केंद्रीय राज्यमंत्री होते. मुस्लीमबहुल विजयपूर शहरामध्ये त्यांनी थेट मुस्लीमविरोधी ‘अजेंडा’ राबवला आहे. या ऐतिहासिक शहराची ‘मुस्लीमबहुल’ अशी ओळख पुसून काढण्यासाठी ते आक्रमक असतात. ज्या शहरात गोलघुमट आणि इतर ऐतिहासिक, जागतिक वारसा दर्जाच्या वास्तू आहेत, त्या शहरात यतनाळ यांनी महापुरुष- राष्ट्रपुरुषांचे अठरा पूर्णाकृती पुतळे उभारले आहेत.

विखारी वक्तव्ये

केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेत भरण्यासाठी राज्यातील भाजपचा प्रत्येक नेता हिंदुत्वाच्या अजेंड्याचा पुनरुच्चार करत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील बसनगौडा पाटील तर काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर अतिशय विखारी टीका करत आहेत.

Web Title: Caste Equations Matter in Karnataka Assembly Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.